सीईओ मनीषा आव्हाळे यांचा झेडपी शाळांसाठी महत्त्वाचा निर्णय
पोषण आहार सुधारणेसाठी किचन बनणार स्मार्ट

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी झेडपीच्या शाळांमधील मुलांना पोषण आहार चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी ‘किचन स्मार्ट” करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मार्च महिन्यात सीईओ मनीषा आव्हाळे यांनी करमाळा तालुक्याचा दौरा केला. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी झेडपी शाळांमधील किचनमध्ये केलेला बदल त्यांनी पाहिला. इतर ठिकाणी दिलेल्या भेटीत अनेक शाळांमध्ये किचनशेड व्यवस्थित दिसून आले नाही. मुलांना जमिनीवर बसूनच आहार दिला जात आहे. शासनाने नेमून दिलेल्या पद्धतीने आहार दिला जात नसल्याचे दिसून आले होते. आपलाच मुलगा शाळेत असेल तर असा आहार चालेल का? आपल्या घरातील किचन कसे असते? याची जाणीव त्यावेळी झाली. त्यामुळे शाळांमधील किचनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. घरातील किचनमध्ये लागणाऱ्या साहित्याचा विचार करून त्या पद्धतीने झेडपी सेस फंड व ग्रामपंचायतच्या 15 व्या वित्त आयोगातून एक लाखापर्यंत साहित्य खरेदी करण्यास मुख्याध्यापकांना परवानगी दिली असल्याचे सीईओ आव्हाळे यांनी सांगितले.
भाजीपाला, फळभाज्या यांचे आयुष्यमान कमी असते. त्यामुळे आहारात नेमून दिलेल्या भाज्या खरेदी करून शाळेत आणल्यानंतर काही भाज्या उरतात. त्यामुळे अशा भाज्यांचा टिकाऊपणा राखून ठेवण्यासाठी शाळांमध्ये फ्रिज आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. तसेच पत्रा शेड मारून स्वयंपाक घर केल्याचे दिसून आले. स्वयंपाक घर चांगल्या पद्धतीने बांधलेले असावे अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. या स्वयंपाक घरात भांडी व जेवताना मुलांना बेंच देण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या वस्तू कुठून व कशा पद्धतीने खरेदी करायच्या याबाबत ही नियमावली देण्यात आल्याचे सीईओ मनीषा आव्हाळे यांनी सांगितले.
आहाराचा दर्जा सुधारणार…
झेडपी शाळांमध्ये देण्यात येणारा आहार उत्तम असावा याकडे लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे किचन ऑनलाईन कॅमेराद्वारे जोडण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. आतापर्यंत शाळांमध्ये कशा पद्धतीने आहार देण्यात होता हे कोणीच पाहत नव्हते. याबाबत ‘सोलापूर समाचार” ने गेल्या महिन्यात लक्ष वेधले होते. हीच बाब गांभीर्याने घेऊन गुणवत्तापूर्ण आहार मुलांना देण्यात यावा अशा सूचना दिल्याचे सीईओ आव्हाळे यांनी स्पष्ट केले.
झेडपीच्या कामाची वाढावी उंची
जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा म्हणून झेडपीकडे अनेक लोक येत असतात. पण झेडपीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन संकुचित दिसून येत आहे. झेडपीच्या कामाची उंची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सीईओ आव्हाळे यांनी सांगितले. झेडपीकडे कामानिमित्त ग्रामीण भागातून लोक येतात. त्यामुळे त्यांना स्वस्तात स्वच्छ नाश्ता, जेवण मिळण्यासाठी लवकरच नवीन कॅन्टीन सुरू करण्यात येईल व हे काम महिला बचत गटाला देण्याचे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. झेडपीतील विभागाची कार्यालयही सुशोभित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आलेल्या लोकांना झेडपीबाबत आत्मीयता वाटेल असा बदल केला जाणार आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाबाबत काय? असे विचारले असता शासनाने घेतलेला निर्णय अद्याप अंमलबजावणीसाठी आलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले.