
सोलापूर : सोलापुरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात आलेला असतानाच भाजपने एक मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गोठात सक्रिय सहभागी असलेले माजी महापौर महेश कोठे यांच्या घरातील सदस्य देवेंद्र कोठे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पालकत्व स्वीकारल्याने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवेंद्र कोठे यांनी म्हटले आहे. बुधवारी सकाळीच नागपूरहून ही बातमी धडकताच उत्तर शहर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. देवेंद्र कोठे हे दोन वेळा नगरसेवक झाले आहेत. पहिल्यांदा काँग्रेस तर दुसऱ्यांदा शिवसेना ठाकरे गटाकडून ते नगरसेवक झाले आहेत. चुलते माजी महापौर महेश कोठे यांनी काँग्रेस सोडून सेनेचा रस्ता धरल्यानंतर पुतणे देवेंद्र यांनीही सेनेचा रस्ता धरला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना नंतर बरीच फाटाफूट झाली. चुलते माजी महापौर महेश कोठे यांनी शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. त्यानंतर मात्र पुतणे देवेंद्र शांत राहिले. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी एकत्र आल्याने चुलते माजी महापौर महेश कोठे यांनी सोलापुरात काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली. पण अस्वस्थ देवेंद्र कोठे यांनी अचानक भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यामार्फत नागपूर गाठले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असे त्यांनी म्हटले आहे.
- आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभेची मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे. गेल्या वेळेस या मतदारसंघातून 25 हजाराचे लीड दिले आता याहून आमची मोठी तयारी आहे असे म्हणत देशमुख यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्यांच्या जोडीला आता उपमुख्यमंत्री अजित पवार गट राष्ट्रवादीचे संतोष पवार, दिलीप कोल्हे, बिजू प्रधाने व आनंद चंदनशिवे यांची मोठी मदत होत आहे. या मतदारसंघात आणखी मोठे धक्के बसतील असे सांगितले जात आहे.