सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

बांधकामाचे आठ कोटी वाटले मग डॉक्टरांना उपाशी का ठेवले?

ऐन लोकसभा निवडणुकीत झेडपी डॉक्टरांचा पगारासाठी संताप

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे कार्यरत असलेल्या 319 कंत्राटी डॉक्टरांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार न झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे पगार बाजूला ठेवून बांधकाम ठेकेदाराची आठ कोटीचे बिले अदा करण्यात आल्याचा आरोप या डॉक्टरांनी केला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर रुग्णांची सेवा करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 319 कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनातर्फे या डॉक्टरांना मानधनवाढ देण्यात आली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये शासनाने परिपत्रक काढून संबंधित डॉक्टरांचे मानधनवाढ व फरक देण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना हा फरक काढला गेला नाही. त्याचबरोबर मार्चअखेर या डॉक्टरांचा तीन महिन्याचा थकीत पगार अदा होणे अपेक्षित होते.  पण डॉक्टरांचा पगार बाजूला ठेवून बांधकामाची आठ कोटीची बिले मंजूर करण्यात आली आहेत. ही बिले मंजूर करण्यात कोणाचा ‘इंटरेस्ट” होता? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या कारभारावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचे नियंत्रण नसल्याचाही आता आरोप सुरू झाला आहे. तीन महिने पगार नसल्यामुळे संबंधित डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाण्यासाठी वाहनाला इंधन व घर खर्चासाठी पैसे नसल्याने अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. याबाबत ग्रुपवर वारंवार तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याचे संबंधित डॉक्टरांचे म्हणणे आहे. प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त असताना डॉक्टरांच्या मानधनाचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मानधन वेळेत न मिळाल्यास काम बंद ठेवल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या प्रश्नी काय मार्ग काढतात,  याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button