सोलापूर : दुष्काळी स्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.
खरीप हंगामात पाऊस न पडल्यामुळे शासनाने सांगोला, माळशिरस, करमाळा, बार्शी आणि माढा या पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीच्या योजनेनुसार या तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध लाभ मिळणार आहेत. एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना घरी थांबण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे 22 एप्रिलपासून अशा विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता मे महिन्यात सुट्टीचा कालावधी असतानाही या पाच तालुक्यातील विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार देण्यात येणार आहे. शाळेमध्ये उपस्थित असताना ज्या पद्धतीने पोषण आहार दिला जात होता त्याच पद्धतीने कोरडा आहार घरपोच देण्याविषयी शिक्षकांना सुचित करण्यात आले आहे, असे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झेडपी शाळांमधील स्वयंपाकघर आद्ययावत करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना ताजे व स्वच्छ आहार देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शाळांमधून नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी झेडपी शाळांची गुणवत्ता वाढीवर भर देण्यात आला आहे.
‘त्या” मुख्याध्यापकाचा शोध…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी फायनान्सच्या माध्यमातून आर्थिक अफरातफर केल्याची तक्रार आली आहे. त्यानुसार ‘त्या” मुख्याध्यापकाचा शोध घेण्यात येत आहे असे शिक्षणाधिकारी शेख यांनी सांगितले. दरम्यान ‘त्या” मुख्याध्यापकाने सोमवारी सायंकाळी झेडपीमध्ये हजेरी लावली होती, असे अनेक शिक्षकांनी सांगितले.