सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुशंगाने सोलापूर व माढा संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सहकार्याने व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ हजार ६१७ मतदान केंद्रामध्ये ‘जनसेवा हीच ईश सेवा” हे ब्रीद वाक्य आरोग्य विभागकडून मतदारांना जास्तीत जास्त मतदान करता यावे यासाठी मतदाराच्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे.
यावर्षी ऐन उन्हाच्या तडाख्यात लोकसभा निवडणूक होत आहे. वाढत्या उष्म्याचा खबरदारी म्हणून मतदारांची काळजी घेण्यासाठी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच पुरेशा औषधाचे किटही केंद्रावर ठेवण्यात येणार असून त्याची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.ऐन उन्हाच्या तडाख्यात निवडणूक प्रक्रिया होत आहे. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अत्यावश्यक त्या प्राथमिक उपचारांसाठी औषध किट व व्हिलचेअर सुविधा उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने पंचायत समित्यांचे सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर एक आशा व पाच मतदान केंद्रापाठीमागे एक आरोग्य कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पुरेशा औषध किटसह मतदानादिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. मतदारांसह मतदान प्रक्रियेत राबणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
असे आहे औषध किट
मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या आरोग्य पथकाला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एक औषधाचे किट पुरवले जाणार आहे. या किटमध्ये ओआरएस 30 पाकीट परबुथ व ड्रेसिंग साहित्यासह प्राथमिक उपचाराचे साहित्य व औषधे असणार आहेत. उष्म्याचा त्रास जाणवला तर मतदारांना तातडीच्या उपचारासह प्रथमोपचार सेवा मिळणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.