सोलापूर : झेडपीच्या प्राथमिक शाळेचे शिक्षकच प्राथमिक शिक्षण विभागाच्या धोरणावर भडकले आहेत. शासनाने जारी केलेल्या बदली धोरणा संदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टीकरण न दिल्याने शिक्षकांचा संताप अनावर झाला आहे. पाच शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासन विभागाला याबाबत निवेदन दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या व पदोन्नती संदर्भातील वेळापत्रक जाहीर केले असून ही प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने राबवणार ? याविषयी शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी शेख यांनी या प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याशी चर्चा करू व त्यानंतर जिल्ह्यातील शिक्षक संघटनाची एक बैठक घेऊन बदली व पदोन्नती संदर्भातील निश्चित धोरण स्पष्ट करण्यात येईल असे सांगितले. शासनाच्याा परिपत्रकानुसार विनाअट बदलीअंतर्गत सर्व शिक्षकांना एक वेळ बदलीची संधी द्यावी. बदलीसाठी सेवेची अट 31 मे ऐवजी 30 जून धरण्यात यावी.मुख्याध्यापक पदोन्नतीपूर्वी मुख्याध्यापकांची बदली, त्यानंतर मुख्याध्यापक पदोन्नती व त्यानंतर इतर संवर्गाच्या बदल्या या क्रमाने बदली व पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी. उपशिक्षकाकडून केंद्रप्रमुखाचा तात्काळ पदभार काढून घ्यावा अशी शिक्षक संघटनाांनी मागणी केली आहे.
शासन धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना एक वेळ बदलीचे संधी देण्यात येणार आहे आत्तापर्यंत तीन हजार शिक्षकांनी विनंती बदलीसाठी अर्ज केल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. ही प्रक्रिया बऱ्याच तालुका स्तरावर माहिती न झाल्याने आणखी एक दिवस विनंती बदलीसाठी संधी द्यावी अशी शिक्षकांची मागणी आहे तर अशी संधी दिल्यास अर्ज वाढतील व ही प्रक्रिया राबवणे अवघड जाईल असे शिक्षण विभागाचे म्हणणे असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे शिक्षकांत संताप व्यक्त होत आहे.
बदली व पदोन्नती संदर्भात पाच शिक्षक संघटनांनी निवेदन दिले आहे. शासन धोरणानुसार विनंती बदलीची प्रक्रिया राबवावीच लागेल. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याशी चर्चा करून शिक्षण विभागाची बैठक घेतली जाईल.
स्मिता पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)