सोलापूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला आहे. या निकालात सोलापूर जिल्ह्याचा निकाल 95.25 टक्के इतका लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 35 हजार 515 मुले व 30 हजार 156 मुली अशा एकूण 65 हजार 671 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातून 33 हजार 315 मुले (93.8 टक्के) व 29 हजार 237 मुली (96.95 टक्के) असे एकूण 62 हजार 552 विद्यार्थी (95.25 टक्के) उत्तीर्ण झाले.
जिल्ह्यात इयत्ता 11 वी प्रवेशासाठी विज्ञान शाखा 32 हजार , कला शाखा 17 हजार तर वाणिज्य शाखा 23 हजार 500 असे एकूण 72 हजार 500 विद्यार्थी प्रवेश क्षमता असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा महाविद्यालयातील जागांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागणार नाही असे चित्र सध्यातरी दिसत आहे. मात्र त्या त्या विभागातील जागांवरून विद्यार्थ्यांचा त्या त्या फॅकल्टीला प्रवेश अवलंबून राहणार आहे.