सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत त्यामुळे इयत्ता पहिलीमधील ३३७८ विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी शिक्षण विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती.त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले. गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत शाळांची पटसंख्या १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते. सद्यस्थितीमध्ये इयत्ता पहिलीचे ७० नोंदणी झालेली आहे.उर्वरित पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली.

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात माढा येथे एकमेव माध्यमिक शाळा आहे.या शाळेतील वर्ग खोल्या व भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलीचे वसतिगृहामधील विद्यार्थीनीसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सुचना करण्यात आली.शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये शाळा पूर्व तयारी शाळेस सर्व सुविधा व स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेनी शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत सर्व शाळांमध्ये परसबाग तयार करणे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतील अमृतरसोई योजना जास्तीत जास्त शाळांमध्ये अंमलबजावणी करणे , आदी निर्णयही घेण्यात आले.यावेळी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) कादर शेख , शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) सचिन जगताप , शिक्षणाधिकारी ( योजना ) सुलभा वठारे , उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासह सर्व गट शिक्षणाधिकारी , विस्तार अधिकारी उपस्थित होते.

डायट येणार सोलापूरमध्ये

वेळापूर (ता.माळशिरस) येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर मधील नार्थकोट हायस्कूल मध्ये स्थलांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची (डाएट) स्थापना ही राष्ट्रीय शिक्षण धोरण १९८६ च्या शिफारशीने आणि केंद्र शासनाच्या मूळ मार्गदर्शक पिंक सूचना पत्रिका १९८९ प्रमाणे करण्यात आली आहे. देशभरात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अशी संस्था प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे या हेतूने स्थापन करण्यात आली आहे.यामध्ये शिक्षण उपसंचालक दर्जाचे १ प्राचार्य, वर्ग १ चे एकूण ४ अधिकारी, वर्ग २ चे एकूण ६ अधिकारी आणि १५ शिक्षकेतर पदे सदर कार्यालयासाठी मंजूर आहेत. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सध्या वेळापूर ता.माळशिरस या कार्यालयामार्फत सन २०२३-२४ मध्ये एकूण २१,६२२ शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.तसेच राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण आयोजन करणे, संशोधन, शिक्षण परिषदांचे आयोजन व मार्गदर्शन करणे.शासनाचे गुणवत्ता वाढीचे उपक्रम राबवणे, यशदा अंतर्गत जिल्ह्यातील गट क व ड कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे, जिल्ह्यातील डी.एल.एड. कॉलेजचे सनियंत्रण करणे इ. कार्ये केली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शालेय शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करणारे डाएटचे जिल्हास्तरीय कार्यालय सोलापूर शहर या जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ११० किमी दूर गैरसोयीच्या ठिकाणी आहे. तसेच वेळापूर बस स्थानकापासून ३ कि.मी.दूर माळावर आहे की ज्या ठिकाणी बस थांबा नाही.या संस्थेमार्फत पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत आढावा, मार्गदर्शन व सहाय्य करणे हे कार्य केले जाते तसेच विविध प्रशिक्षणांचे व्यवस्थापन, नियोजन व अनुधावन करून जिल्ह्यातील शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कार्य केले जाते.

यशदा, पुणे या संस्थेमार्फत सलंग्नित राहून जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देणारी जिल्हास्तरीय शिखर संस्था म्हणून कार्य करण्याची जबादारी आहे. सदरच्या सर्व प्रशिक्षणासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व योजना तसेच इतर काही विभाग प्रमुखांशी वेळोवेळी समन्वय साधावा लागतो.प्रस्तुत कार्यालय वेळापूर ता. माळशिरस येथे असल्याने जिल्हा मुख्यालयातील कार्यालयाशी प्रत्यक्ष समन्वय साधताना वारंवार अडचणी येतात.सदर कार्यालय हे नॉर्थकोट हायस्कूल, सोलापूर शहर येथील इमारतीत स्थलांतरित करणेबाबत बाबत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र दिले आहे.प्रस्तुत कार्यालय सोलापूर शहर या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास जिल्ह्यास फायदे होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *