सोलापूर : शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना विनंती बदलीची शेवटची संधी म्हणून जिल्ह्यातील 2700 शिक्षकांच्या ऑफलाइन बदल्या करण्यात येणार आहेत.
शासनस्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होत आहेत. पती-पत्नी एकत्रित आजार संबंधित शिक्षकांच्या विनंती बदल्यांना शेवटची संधी देण्यात येत आहे. जुन्या शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून नव्याने आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी ही प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन आहे. यासाठी यापूर्वीच शिक्षकाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अशा शिक्षकांना आता विनंती बदलीची शेवटची संधी मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशनाद्वारे या बदल्या ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. राज्यभर अशी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्याची जंगी तयारी केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करताना गोंधळ होईल अशी भीती शिक्षण विभागाला वाटत होती परंतु सीईओ आव्हाळे यांनी अत्यंत पारदर्शकपणे सर्वच शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पहिल्यांदा शिक्षकांच्या विनंती ऑफलाइन बदल्या होतील. त्यानंतर मुख्याध्यापक पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जाईल आणि त्यानंतर पोर्टलवरून नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना शाळांवर नियुक्ती देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. आचारसंहितेमुळे हे काम रखडले होते पण आता शाळा सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया राबविण्याची शिक्षण विभागाने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा नाथा बऱ्यापैकी शिक्षक मिळतील अशी अशा निर्माण झाली आहे.
शिक्षकांच्या विनंती बदलीची प्रक्रिया ऑफलाइनपणे राबविण्यात येणार आहे. सुमारे 2700 शिक्षकांच्या बदल्या करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मुख्याध्यापक पदोन्नती होईल आणि शेवटी नव्याने आलेल्या शिक्षकांना समुपदेशनाद्वारे शाळा दिल्या जातील. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जाणार आहेत.
कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी