सोलापुरात आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने घेतला अंगणवाडीत प्रवेश
झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घालून दिला आदर्श

सोलापूर : इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीत प्रवेश मिळावा म्हणून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पालक खाजगी शाळांच्या पायऱ्या झिजवत असतानाच सोलापुरातील एका आयएएस अधिकाऱ्याने सरकारी अंगणवाडीत आपल्या मुलीचा प्रवेश घेतला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड सुरू झाली आहे. नामवंत शाळेत प्रवेश मिळत नाही म्हणून अनेक पालकांची ओरड आहे. त्यामुळे शासनाने गरिबांच्या पाल्यांनाही नामवंत शाळेत प्रवेश मिळावा म्हणून आरटीआय प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्येही अनेक पालक समाधानी नाहीत. खाजगी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांच्या फी व त्यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या नियम व अटी यामुळे पालक वैतागलेले असतात. तरीपण सरकारी यंत्रणेवर ठपका ठेवत अनेक पालक खाजगी शाळांमध्येच आपल्या पाल्यांना प्रवेश घेताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारी शाळा ओस पडत असतानाचे विदारक चित्र समोर येत आहे. प्रत्येकजण सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत असे सांगतो. पण प्रत्यक्षात सरकारी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश देताना दिसत नाही. सरकारी अधिकारी बदलून आल्यानंतर आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून स्वतः सरकारी गाड्या घेऊन हेलपाटे घालताना दिसतात. पण याला झेडपीच्या सीईओ आव्हाळे अपवाद ठरल्या आहेत. पालकांची ही मानसिकता बदलण्यासाठी समाजातील चांगल्या लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या मुलीला अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे
आयएएस अधिकारी मनिषा आव्हाळे यांची कन्या अनवी ही दक्षिण सोलापुरातील हत्तुर येथील अंगणवाडीत गुरुवारी दाखल झाली. अंगणवाडीतील इतर मुलांबरोबर समरस होऊन तिने आनंद लुटला.अंगणवडीतील गुरुवारच्या पाककृतीचा आहार तांदळाची खिचडी तिने आनंदाने खाल्ली. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला ही बाब अतिशय आनंदाची ठरली आहे. इतर अधिकाऱ्यांनी सीईओ आव्हाळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.