ए दमदाटी करायला का? चल सरक…
जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला गोंधळ

सोलापूर: जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एकच्या सभेत सभेला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करणे व आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून सभासदांनी आक्षेप घेतल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. वार्षिक सभेला नव्हे तर मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी अधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते, पतसंस्थेचा सर्व कारभार पारदर्शक आहे. याबाबत सर्वांच्या शंकांचे निरसन केले आहे व दीप प्रज्वलन कार्यक्रम सभेआधी का केले नाही? असा गोडसे यांचा आक्षेप होता, असे स्पष्टीकरण चेअरमन विवेक लिंगराज यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 ची सन 2023- 24 ची 90 वी सर्वसाधारण सभा शनिवारी शांतीसागर मंगल कार्यालयात चेअरमन विवेक लिंगराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत एकूण विषय पत्रिकेवरील 17 व चार आयत्या वेळचे विषय चर्चेला ठेवण्यात आले होते.
सभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे काही अधिकारी सभेला उपस्थित राहण्यासाठी सभागृहात आले याला सभासदाने आक्षेप घेतला सभेला अधिकाऱ्यांना निमंत्रित करता येते का असा सवाल उपस्थित केल्यावर गोंधळ सुरू झाला या गोंधळातच अध्यक्ष लिंगराज यांनी सभा सुरू करण्यासाठी दिप प्रज्वलन करण्यास सुरुवात केली. याला अविनाश गोडसे यांनी आक्षेप घेतला. त्यावर लिंगराज व गोडसे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली प्रकरणाचे गांभीर्य ओळखून इतर सभासदांनी मध्यस्थी केल्यावर प्रकरण शांत झाले. सभा सुरू झाल्यानंतर सभासदांनी अनेक विषयांना आक्षेप घेतला.
किरकोळ खर्च ६२१६९ इतका दाखविण्यात आला आहे तो कशासाठी खर्च करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी राजेश देशपांडे यांनी केली. त्याचबरोबर वार्षिक सभा खर्च ५१५५७, सभासद अल्पोपहार भत्ता २३७०००, जाहिरात खर्च ७०००१ इतका दाखविला आहे. कोणाला वर्षभरात जाहिरात दिली डिटेल्स द्यावे, जाहिरातीची आवश्यकता काय? या बाबत माहिती दया, फोटो खर्च १८९५०, सत्कार खर्च १९६२५ इतका दाखविला आहे. सत्कार कोणाचा केला कोणाचा केला माहिती द्यावी, तिळगुळ व वाण वाटप खर्च १८८०० इतका खर्च दाखवण्यात आला आहे. हा कार्यक्रम करण्याची गरज काय?, आय एस ओ मानांकन ६५०० रुपये खर्च करण्याची आवश्यकता तसेच ते कोणत्या एजन्सीकडून केले डिटेल्स द्यावे, क्यू आर कोड खर्च २२-२३ मध्ये १२०००, २३-२४ मध्ये १४००० रुपये इतक्या खर्च करण्यात आला आहे. हे काम कोणाला दिले? एजन्सीचे नाव प्रोपायटर कोण? असे आक्षेप सभासदांनी घेतले. तसेच संचालक मंडळाला कोणत्याही परिस्थितीत दोन वर्ष मुदतवाढ देऊ नये असा आक्षेप ऍड देशपांडे यांनी घेतला. या एकही मुद्द्याचे संचालक मंडळांनी समर्पक उत्तर दिलेले नाही असाही आरोप त्यांनी केला.
सभेनंतर अध्यक्ष लिंगराज यांनी सविस्तर चर्चेअंती दुरुस्ती सुचेनेसह सर्व विषय मंजूर करण्यात आले अशी माहिती दिली. याप्रसंगी सभासद संजय गौडगाव यांनी अत्यंत उपयुक्त सूचना मांडल्याने त्यांच्या अभिनंदन ठराव घेण्यात आला. तदनंतर कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी,नरेंद्र खराडे, संजय पारसे, लेखाधिकारी श्रीधर नादरगी यांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभासदांच्या खात्यावर 94 लाख लाभांश जमा करण्यात आले. या सभेस जिल्यातील तालुक्यातील, मुख्यालयातून बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचे शाल देऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतील सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी व इतर पतसंस्थेच्या चेअरमन पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. सर्वसाधारण सभेस चेअरमन विवेक लिंगराज,ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, डॉ.एस. पी. माने,दीपक घाडगे,दत्तात्रय घोडके, शहाजान तांबोळी, सुंदर नागटिळक, विष्णू पाटील, शेखर जाधव, हरिबा सप्ताळे, त्रिमूर्ती राऊत,धन्यकुमार राठोड, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिर,सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. माने यांनी केले तर आभार प्रदर्शन विष्णू पाटील यांनी केले. सभेत झालेल्या गोंधळाबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी चेअरमन लिंगराज व सभासद गोडसे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॉल रिसीव केलेला नाही. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर चेअरमन लिंगराज यांनी सभासदांच्या आक्षेपांबाबत खुलासा केला आहे. काही सभासद सभेला उशिरा आले. त्याआधीच चर्चेअंती विषय मंजूर झाले होते. अविनाश गोडसे, राजू मानवी व राजेश देशपांडे यांनी उपस्थित केलेल्या सर्व आक्षेपांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत. वर्षभरातील विविध कार्यक्रमाच्या खर्चामध्ये पारदर्शकता आहे. अधिकाऱ्यांना सभेला नव्हे तर मान्यवरांचे सत्कार करण्याच्या कार्यक्रमाला बोलावले होते. सभा सुरू होण्याआधी दीप प्रज्वलन का केले नाही असा गोडसे यांचा आक्षेप होता पण सत्काराच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे येणार असल्यामुळे पाहुणे आल्यानंतर हा कार्यक्रम घेतला.
मी नुकताच सेवानिवृत्त झाल्याने सभासदाचा राजीनामा दिला आहे. पण गेल्या वर्षभरातील कारभाराचा जाब विचारण्याचा मला अधिकार आहे. आम्ही सवाल उपस्थित केल्यानंतर प्रकरण दाबून नेण्यासाठी अध्यक्षांनीच आपल्या हस्तकामार्फत गोंधळ घडवून वेळ मारून नेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांना बोलावता येत नाही. पतसंस्थेच्या खर्चात अनियमितत झाली आहे. याबाबत मंगळवारी जिल्हा उप निबंधकांकडे तक्रार करणार आहोत. त्रयस्थ व्यक्तिमार्फत पतसंस्थेची चौकशी न झाल्यास उपोषण करणार आहोत.
राजेश देशपांडे, माजी सभासद