सोलापूर : मंद्रूप मधील शेत- शिवार, मोकळ्या जागेत वडाची रोपे लावून त्याचा संवर्धनाचा निर्धार करीत मंद्रूप येथे वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यातआली.
गावामध्ये वडाच्या झाडाची संख्या खूपच कमी आहे. वटपूजनासाठी माता-भगिनींना पोलीस स्टेशन येथील दत्त मंदिर अथवा इतर दूर ठिकाणी जावे लागते. महिलांची ती अडचण दूर होण्यासह, गावच्या चौफेर वडाची झाडं वाढावी उद्देशाने रानवेध फाउंडेशन व आम्ही मंद्रूपकर ग्रुप तर्फे शुक्रवारी वटपौर्णिमा निमित्त वडाची मोठी २१ रोपं भेट देण्यात आली. दत्त मंदिर येथे सरपंच अनिता कोरे यांच्या हस्ते वट पूजनासाठी आलेल्या महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य विद्युलता कोरे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मेंडगुदले, प्रिती केवटे, लक्ष्मीबाई गायकवाड, शैला म्हेत्रे, प्रतिभा साठे, मंजुषा डोकडे, यांनी त्याच ठिकाणी रोपांना सुत गुंडाळून पूजा केली.
गावच्या शिवारात वडाची झाड खूप कमी आहेत. त्यामुळे सुवासिनीना खूपच लांब पूजेसाठी जावे लागते. रानवेध व आम्ही मंद्रूपकर टीमने दिलेलं रोप आमच्या परिसरातील सार्वजनिक जागेत लावून त्याचे संवर्धन करू. पुढील वर्षापासून परिसरातील त्याच झाडाची पूजा करू, असा विश्वास वैशाली जाधव यांनी व्यक्त केला. रानवेधने दिलेली वडाची रोपं स्नेहपूर्वक नेण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. याप्रसंगी सचिन साठे, रवी केवटे, उत्कर्ष भागवत, विनोद कामतकर यांच्यासह आम्ही मंद्रूपकर टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक अभिनव उपक्रम…
रानवेध फाउंडेशन व आम्ही मंद्रूपकर ग्रुप गावामध्ये पर्यावरण स्नेही अभिनव उपक्रम सातत्याने राबविते. गावातील मंदिराची स्वच्छता, जागतिक महिला दिन निमित्ताने गावातील निराधार, वंचित घटकातील महिलांचा सन्मान करण्यात आला होता. धूळवड निमित्ताने हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा, जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन व जलदिनिमित्त जागृती अभियान राबविण्यात आले.