सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी लातूर पोलिसांनी अटक केलेला सोलापूर झेडपी प्राथमिक शाळेवरील शिक्षक संजय जाधव याच्या मोबाईलमधून महत्वाचे पुरावे पोलिसांनी हस्तगत केल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईचा अहवाल आल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषद शिक्षक जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहे.
नीट परीक्षा घोटाळाप्रकरणी पोलिसांनी शिक्षक संजय जाधव यांच्यासह अन्य साथीदाराला अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी शिक्षक संजय जाधव याचा मोबाईल जप्त केला असून या मोबाईलमध्ये अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. नीट परीक्षा घोटाळ्याचा मास्टरमाइंड आरोपी संजय जाधव हाच असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय जाधव हा माढा तालुक्यातील टाकळीवस्ती शाळेवरील झेडपी शाळेमध्ये नियुक्तीस होता. नुकत्याच झालेल्या बदल्यामध्ये त्याची अक्कलकोट तालुक्यात बदली झाली आहे. दरम्यान तो नीट परीक्षा घोटाळ्यात अडकल्याचे कळतच प्राथमिक शिक्षण विभागाने तो शाळेवर किती दिवस गैरहजर होता याचा अहवाल तयार केला आहे. आता लातूर पोलिसांनी केलेला कारवाईचा अहवाल आल्यानंतर आरोपी शिक्षक संजय जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. नीट परीक्षा घोटाळामध्ये सोलापूरचे नाव आल्यामुळे हा विषय चर्चेचा झालेला आहे.