सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नियुक्त असलेल्या डॉक्टरांनी भानगडी केल्या तरी त्यांच्यावर कारवाई होत नाहीत असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यामुळे वैतागलेल्या माढा तालुक्यातील पिंपळनेर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चक्क बुलढाणा झेडपीच्या सीईओनी घेतलेल्या एका निर्णयाची कॉपीच तक्रारीसोबत जोडली आहे.
जगभरात डॉक्टरांना देवदूत असे संबोधले जाते. खरेच रुग्णांना जीवदान देणारे डॉक्टर देवदूत असतात अशी सर्वांची धारणा आहे यात वाद नाही. पीडित रुग्णांना उपचाराची खात्री देऊन त्यांचा आजार बरा करणारे डॉक्टर सर्वांनाच आधार असतात. त्यामुळे समाजात डॉक्टरांना मोठे महत्त्व आहे. पण सरकारी विभागात नोकरी करणारे डॉक्टर त्यांच्या मानसिकतेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहावयास मिळतात. असेच किसे सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात चर्चेत आहेत. करमाळा तालुक्यातील जेऊर येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टराची तक्रार सध्या चर्चेत आहे. कर्मचाऱ्यांनी तक्रार करून सुद्धा अद्याप आरोग्य विभागाने यावर निर्णय घेतलेला नाही.
पण माढा तालुक्यातील पिंपळनेर आरोग्य केंद्रातील डॉक्टराची चर्चा मात्र खूप जुनी आहे. याबाबत कागदी घोडे नाचवूनही अद्याप त्या डॉक्टरवर कारवाई न झाल्यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. या कर्मचाऱ्यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडेही तक्रार केली. चक्क पिंपळनेर ग्रामपंचायतने या डॉक्टराच्या कार्यपद्धतीविरुद्ध ठराव केला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तत्कालीन अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते यांनीही या प्रकरणाची चौकशी केली. पण जिल्हा परिषद मुख्यालय स्तरावरून ‘त्या” डॉक्टरावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतपलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये आत्तापर्यंत झालेल्या चौकशीची माहिती जोडली आहे. अशा प्रकरणांमध्ये इतर जिल्हा परिषद काय करतात याचा पुरावाही जोडला आहे. या तक्रारीसोबत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर काय कारवाई केली याचा पुरावा जोडला आहे. इतर जिल्हा परिषदांमध्ये वादग्रस्त डॉक्टरांवर जिल्हा परिषद मुख्यालय स्तरावरून कारवाई होते मग या प्रकरणांमध्ये अशा वादग्रस्त डॉक्टरांना वाचवतोय कोण? असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. पहा हे पुरावे…