सोलापूर : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे आता बऱ्याच कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कॉलेजमध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश मिळाल्यानंतर पालकांना चिंता असते ती त्यांच्या राहण्याची. जिल्हा परिषदेच्या जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामध्ये सन २०२४-२५ मध्ये अकरावी ते पदवीधरपर्यंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी १५ जुलै ते २० जुलैपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
जिल्हा परिषदेच्या वस्तीग्रह प्रवेश याबाबत माहिती देताना शिक्षणाधिकारी कादर शेख म्हणाले की जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ या वर्षासाठी जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह पार्क चौक सोलापूर येथे मुलांसाठी व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शेळगी , सोलापूर येथे मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या zpsolapur.gov.in या संकेतस्थळावरील सूचनांचे वाचन करुन प्रवेश फार्म भरुन दि.१५ जुलै ते दि.२० जुलैपर्यंत वसतिगृहात द्यावयाचा आहे.
या प्रवेश अर्जाची छाननी २२ जुलै ते २४ जुलै या कालावधीत आणि प्रवेश मान्य विद्यार्थी – विद्यार्थीनींची यादी दि.२५ जुलै ते दि.२६ जुलै या दरम्यान जाहीर केली जाणार आहे.त्यानंतर जवाहरलाल नेहरु विद्यार्थी वसतीगृहासाठी मुलांना ७ हजार १०० रुपये व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृहामध्ये मुलींसाठी ६ हजार १०० रुपये प्रवेश शुल्क व अनामत रक्कम चलनाद्वारे २९ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत भरावयाचे आहे.त्यानंतर १ आॕगस्ट पासून प्रत्यक्ष वसतीगृह सुरू होऊन ३१ मे २०२५ पर्यंत चालू राहणार असल्याचेही शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.