December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

केवायसी केली; शेतकऱ्यांच्या हातात मिळाले फक्त सर्टिफिकेट

सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन सेंटरवर जाऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी केवायसी केली पण हाती फक्त सर्टिफिकेटच मिळाले आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक महिन्यापूर्वी विम्याची रक्कम मंजूर झाल्याचे सांगतानाच नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असून शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घ्यावी असे आवाहन केले होते. नुकसान भरपाई मंजूर झालेल्या यादीतील शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामार्फत संदेश गेले होते.  त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ऑनलाइन सेंटरवर जाऊन शंभर रुपये शुल्क भरून केवायसी करून घेतली आहे. केवायसी केल्याबरोबर शेतकऱ्यांना संबंधित रक्कम मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे पण केवायसी करून महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या हाती काहीच नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. खरीप पेरणी अंतिम टप्प्यात असताना पेरणीच्या कामासाठी खते, बी- बियाणे व मजुरीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज भासत आहे. पीक कर्जासाठी बँका नवनवीन कागदपत्राची अट घालत असल्याने शासनाने मंजूर केलेली नुकसान भरपाई तरी वेळेत हाती द्यावी अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांची ससेहोलपट…

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे पण अधिवास प्रमाणपत्र जातीचा दाखला व उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलचे उंबरे झिजवण्याची पाळी आली आहे. सोलापूर प्रांत कार्यालयाकडे विद्यार्थ्यांचे सहा हजार दाखले प्रलंबित असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. प्रांत कार्यालयातील स्वामी यांना भेटल्यानंतर आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” व आषाढी यात्रेच्या कामात आहोत अशी उत्तरे दिली जात असल्याची पालकांनी तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळाले नाही तर त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या दोन्ही प्रश्नात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी होत आहे.