सोलापूर : 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसली लालसा निर्माण झाली नाही. धाडसी प्रवृत्तीमुळेच प्रमाणिकपणे काम करता आले असं सांगून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी प्रकट मुलाखतीमधून आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला. ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी आपल्या खुमासदार शैलीतून मुलाखत घेत हुतात्मा स्मृती मंदिरातील वातावरण हलके फुलके केले.

6 वर्षाच्या जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात 100 पेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यत पोहोचवण्याचा विक्रम केल्याबद्दल अ‍ॅड.प्रदीपसिंह राजपूत मित्र परिवाराच्या वतीने बुधवार दि. 24 जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी प्रशांत बडवे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देत प्रास्ताविक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेचा, किरण सुतार, मिलिंद फडके, ज्ञानेश्‍वर म्यकल, रंगनाथ बंकापूर, व्यंकटेश कैंची, मदन मोरे, प्रशांत बडवे यांच्यावतीने अ‍ॅड प्रदीपसिंह राजपूत यांचा सप्त्नीक सत्कार करण्यात आला. प्रसाद जिरांकलगीकर यांनी वैयक्तीक गीत सादर केले.

कोणत्याही सोई सुविधा नसताना अभ्यासाची ओढ कशी लागली आणि जीवनाचा प्रवास कसा सुरू झाला असा प्रश्‍न विवेक घळसासी यांनी विचारताच प्रदीपसिंह राजपूत यांनी घरातील परिस्थिती कशी बेताची होती. त्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेकडे कसे ओढला गेलो याबाबतचा प्रवास सांगितला. संघाच्या मुशीत तयार झाल्याने धाडसी वृत्तीची वाढ झाली आणि त्यातूनच जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना कोणत्याही आमिषाला आणि प्रलोभनाला बळी पडलो नाही. कुटुंबाच्या गरजा मर्यादित असल्याने चैनीच्या वस्तूंची आवश्यकता वाटली नाही म्हणूनच प्रामाणिकपणे न्यायदानाच्या सेवेत काम करता आले. कोणताही पक्ष, धर्म न पाहता काम केल्याने चांगले अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखतकार विवेक घळसासी यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना प्रदीपसिंह राजपूत यांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यामुळे सभागृहात टाळ्यांचा गडगडाट होत होता. पत्नीसोबत लुनावर बसून सिध्देश्‍वर मंदिरातील प्रवास असो की संघ परिवारासाठी आणि वडीलांसाठी घेतलेली नवी कार तसेच आरोपींना शिक्षेपर्यत पोहोचवल्यानंतर पीडित कुटुंबातील 50 सदस्यांनी येवून आभार व्यक्त केल्याचा प्रसंग असे अनेक किस्से सांगत प्रदीपसिंह राजपूत यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच जीवनाला कलाटणी मिळाली हे सांगून मुलाखतीला विराम दिला.

या मुलाखतीच्या शेवटी रसिका कुलकर्णी आणि सारीका कुलकर्णी यांनी पसायदान म्हणून समारोप केला . या कार्यक्रमाला दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळे, उद्योगपती दत्ता सुरवसे, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, मुंबई गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे, रेखा राजपूत, ओंकारसिंह राजपूत यांच्यासह वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *