सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती जाहीर केले मात्र अद्याप संबंधित बदली शाळांवर हजर होण्याचे आदेश न दिल्याने अशा शाळा मुख्याध्यापकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने समुपदेशनाद्वारे शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देत नवीन शाळावर नियुक्ती दिली. या प्रक्रियेला महिना उलटला तरी अद्याप नवीन मुख्याध्यापकांना शाळेवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना होत आला आहे. अनेक शाळांमधील विद्यार्थी पाठ्यपुस्तक, गणवेश व पोषण आहाराच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले आहे. शाळांवर मुख्याध्यापक नसल्याने अशी अनेक कामे खोळंबल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली व यादी प्रशासन विभागाकडे सादर केल्याचे शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नवीन कर्मचारी भरती, आषाढीवारी या कामांमुळे मुख्याध्यापकांना आदेश न मिळाल्यामुळे नवीन शाळांवर जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा शाळांवरील विद्यार्थीच आता शिक्षकांना विचारू लागले आहेत, गुरुजी..! आपले नवीन हेडमास्तर कधी येणार? विद्यार्थ्यांच्या या मिश्किल प्रश्नाला उत्तर देताना शिक्षकांचीही अडचण होत आहे.