सोलापूर : जिल्ह्यातील नागरिकांना आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने पंढरपुरात सोलापूरच्या शासकीय रुग्णालयापेक्षा मोठ्या रुग्णालयाला मंजुरी दिल्याचा अध्यादेश जारी केला आहे.
इंग्रजाच्या काळात साथीच्या रोगांवर इलाज करण्यासाठी सोलापुरातील मध्यवर्ती ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आली. जुन्या बी ब्लॉकच्या दगडी इमारतीत सात रोपचाराचे विविध विभाग सुरू करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर या रुग्णालयात सुधारणा होत गेली. सोलापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर शस्त्रक्रिया व विविध शारीरिक पीडांवर उपचार करणारे विभाग सुरू झाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, मिरजनंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाची ख्याती झाली. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर व कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, अफझलपूर या परिसरातील रुग्णांची सेवा सुरू झाली. अलीकडच्या काळात शासकीय रुग्णालयावर रुग्णांचा भार वाढल्यामुळे तीनशे खाटांचे स्वतंत्र जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. परंतु अद्याप येथे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालयही वाढविण्यात आले आहे. असे असले तरी पंढरपुरातील आषाढी, कार्तिकी वारीच्या काळात राज्यभरातून येणाऱ्या भाविकांमुळे आरोग्य सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे पंढरपुरात उपजिल्हा रुग्णालया ऐवजी जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी होत होती. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक हजार खाटाच्या रुग्णालयाची घोषणा केली होती. त्याप्रमाणे शासनाने सहा विभागाच्या या रुग्णालयाच्या मंजुरीचा अध्यादेश आठ ऑगस्ट रोजी जारी केला आहे. प्रत्यक्षात हे रुग्णालय अस्तित्वात आल्यानंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयावरचा भार कमी होणार असून यामुळे रुग्णसेवा आणखीन सुधारणार आहे.
असा आहे नवीन रुग्णालय मंजुरीचा आदेश…