सोलापूर : राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या लवकरच होणार असून सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाने जिल्ह्यांमधील तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व स्थानिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार बदलांची यादी तयार होत आहे. जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांची यादी शासनाकडे गेली आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख व माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप जिल्ह्याचे रहिवासी आहेत. अकार्यकारी पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. पण शिक्षण विभागात शासन कोणता नियम लावते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र माध्यमिक शिक्षण अधिकारी जगताप यांनी बदलीसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी पद हे गेल्या चार वर्षात चर्चेचे ठरले आहे. रजिस्टर गहाळप्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कर्मचाऱ्यांना बदलले होते. पण नव्याने दिलेले कर्मचारीही वादग्रस्त ठरले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाला चांगले कर्मचारी मिळत नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे आता नव्या नियुक्तीत कोणाची वर्णी लागणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सीईओंची कसोटी…
मागील काही दिवसात काही विभागाची घडी विस्कटली आहे. समाजकल्याण अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी बरीच ओरड सुरू आहे. योजना विभाग नावालाच आहे. या विभागाकडे ना कर्मचारी ना योजना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. धोकादायक शाळा बांधकाम विषय वादग्रस्त ठरला आहे. शाळांची गरज पाहून बांधकाम निधी देण्याऐवजी आमदारांच्या शिफारशीवर कारभार चालला आहे. न्यायालयाने शाळांची पाहणी करून गरजू शाळांना स्वच्छतागृह तातडीने बांधावी अशी शिफारस करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. झेडपीतील चांगले रस्ते उखडून नवे करण्याऐवजी शाळांना निधी देण्यात यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे नूतन सीईओ कुलदीप जंगम यांना या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे होणार आहे.