सोलापूर : गेल्या महिन्यात ईडीची सोलापुरात धाड पडली. पण याचा थांगपत्ता कोणालाच नव्हता. दिल्ली आकाशवाणीवरून ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सोलापूरच्या “फ्लोरन्स’ कंपनीच्या सिगारेटची ही कमाल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिल्ली आकाशवाणीने “दिल्ली, सोलापूर, मुंबईसह देशातील दहा शहरांमध्ये ईडीची धाड’ अशी दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर “सोलापूर समाचार’ वर ही बातमी झळकली. या बातमीनंतर सोलापुरात खळबळ उडाली आहे. ईडीची धाड… कधी व कुठे पडली? असे जो- तो विचारू लागला आहे . पोलिसांनाही याबाबत लोंकाकडून विचारणा झाल्याचे सांगण्यात आले. पण ईडीची कारवाई महसूलशी संबंधित असल्याने अनेकांनी या कारवाईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. चौकशीत ईडीने सोलापुरातील “फ्लोरन्स’ सिगारेटच्या कंपनीवर धाड टाकल्याची माहिती मिळाली आहे. मुळात अशी सिगारेट कंपनी सोलापुरात आहे, हीच सोलापूरकरांना धक्कादायक बातमी आहे. विडी कामगारांचा संघर्ष सुरू असताना सोलापुरात सिगारेट कारखाना कधी आला हे कोणाला कळलेच नाही. कारण ही सिगारेट मुळात भारतीयांसाठी बनतच नव्हती. सोलापुरातील ही सिगारेट चक्क एक्सपोर्ट होत असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या हा कारखाना बंद असला तरी मागील उत्पादनावरून ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. दुबईमधील अमली पदार्थाच्या तस्करीवरून हा सिगारेटचा कारखाना चर्चेत आला आहे. यावरून परदेशातून अमली पदार्थ पुरवले जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे सोलापुरातील ही कु प्रसिद्ध सिगारेट कोणी व कशी बनवत होते? याची आता चर्चा सुरू झाली आहे.
ईडीच्या धाड टाकणाऱ्या पथकाची गाडी सोलापूरच्या सात रस्ता चौकातील एका पेट्रोल पंपावर थांबून होती. याशी संबंधित व्यक्तीने होटगी रोडवर सिद्धेश्वर कारखान्याच्या पुढे शेतात हा सिगारेटचा कारखाना उभारला आहे, अशी माहिती मिळत आहे. या कारखान्यात काम करणारे कामगार युपी- बिहारमधील होते, अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे या कारखान्यात तयार होणाऱ्या सिगारेटमध्ये कुठली तंबाखू वापरण्यात येत होती व त्यात आणखी काय-काय मिसळले जात होते, याची माहिती कोणालाच नव्हती. एक्सपोर्ट होणाऱ्या या सिगारेटचे धागे-दोरे ईडीने खणून काढले आहेत. सोलापूरमध्ये काही नाही म्हणणाऱ्यांसाठी ही धक्कादायक माहिती आहे. या कंपनीचा मालक दर पंधरा दिवसाला दुबईला पळायचा. असा कोणता कच्चामाल सिगारेटला वापरला जायचा याचा शोध सुरू आहे.
सोलापूरच्या युवकांना काम मिळावे चांगले उद्योग यावेत अशी सततची मागणी आहे. पण मागणी नसताना येणारे हे उद्योग सोलापूरच्या बदनामीला कारणीभूत ठरत आहेत. यापूर्वी चिंचोळी एमआयडीसीतील एका कारखान्यातून ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यानंतर सोलापूर शहराजवळच दक्षिण सोलापुरातील शेतात अमली पदार्थसंबंधित सिगारेटचा कारखाना उघडकीला आला आहे. या कारवाई संबंधी अधिक तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. ईडीकडून अजून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.