May 2, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सांगोल्यात दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी; तरीपण ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची परीक्षा होणार

याबाबत सांगोल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले (वय ३४) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत १६ मार्चला दुपारी साडेचार ते १७ मार्च रोजी सकाळी साडेआठ यावेळेत ही घटना घडली आहे. सांगोला विद्यामंदिर येथील बोर्ड कस्टडी रूममध्ये ठेवलेल्या पेटी क्रमांक ५४४९ मधील भूगोल विषयाच्या २५-२५ प्रश्नपत्रिकांची पाकिटे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी १७ मार्च रोजी सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन मोरे करीत आहेत.

‘सीसीटीव्ही’ बंद

सांगोला तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर येथील बोर्ड कस्टडी रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, कस्टडी रूमबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेऊन प्रश्नप्रत्रिका चोरुन नेल्याचा संशय आहे. त्या शाळेत ६४ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण त्या रात्री एकही सुरु नव्हता. पेपर सुरु असतानाच ‘सीसीटीव्ही’ सुरु ठेवण्यात येत होते. पण नंतर हे सीसीटीव्ही बंद करण्यात का आले याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही तपासून संशयिताचा शोध सुरु केला आहे.

चार पथके रवाना

प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रात्री अभ्यासिकेसाठी आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची चौकशी केली. श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. ठसे तज्ज्ञांनाही बोलावण्यात आला होते. संशयिताच्या शोधासाठी २५ अधिकारी व अंमलदारांची चार पथके रवाना झाली आहेत अशी माहिती यावलकर यांनी दिली. पेपर चोरीचा प्रकार कळताच पुणे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकीरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडल्या प्रकाराची जिल्हाधिकारी कुमाराशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही माहिती घेतली. दरम्यान पेपर चोरीला गेले तरी बोर्डाकडून तातडीने दुसऱ्या प्रश्नपत्रिकाची व्यवस्था करण्यात आली असून ठरल्याप्रमाणे दहावीचा पेपर होणार असल्याचे सांगण्यात आले.

गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक निलंबीत

या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बोर्डाने सांगोल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबीत केले आहे. तसेच बंदोबस्तावरील पोलिसाच्या हलगर्जीपणाबद्दल त्या अंमलदारावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे असे अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी सांगितले.