सोलापूर : झेडपी शाळेने बनविलेले वनौषधी झाडांचे मियावाॅकी जंगल, झाडाच्या पालापाचोळ्या पासून बनविलेले सेंद्रीय खत व त्या खताचा वापर करून मुलांच्या आहारासाठी वन भाज्यांची फुलविलेली परसबाग, पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेली रंगीबेरंगी फुलझाडे, बागेत गवती चहापासून ते आडुळसापर्यंत विविध वनषौधीची लागवड. दगडी दरीतून पडणाऱ्या पाण्याचा धबधबा. हे चित्र कुठले जंगलातील नसून करमाळा तालुक्यातील गोयेगाव जिल्हा परिषद शाळेचे आहे. पुणे विभागीय उपायुक्त विजय मुळीक यांना शाळेचे हे रुपडे पाहून नवल वाटले.
गोयेगाव येथे संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गोयेगाव ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली.या समितीमध्ये पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उप आयुक्त (विकास ) विजय मुळीक, सहाय्यक आयुक्त डॉ.सोनाली घुले,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रविण पाटील, करमाळ्याचे गट विकास अधिकारी मनोज राऊत, सहाय्यक गट विकास अधिकारी देविदास सारंगकर, पुणे जिल्हा माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक जयंत करपे, सहाय्यक प्रशासन अधिकारी शैलेश सराफ, विभागीय कार्यालयातील विशाल बोरकुंडे, अविनाश लोंखडे यांचा समावेश आहे.यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी सल्लगार महादेव शिंदे, सी.आर.सी.उमेश येळवणे, सरपंच उज्वला माळशिखरे, दशरथ माळशिसरे,ग्रामसेवक अमोल सरडे, सदस्य रियाज शेख, प्रमोद सोनवणे, रविंद्र महानवर, काशिनाथ आटोळे, बाबुराव शेंडगे, पोलिस पाटील विजयकुमार पाटील, अक्षय शेंडगे, मुख्याध्यापक अजिनाथ तोरमल, अशोक गिरे, ग्रामसेवक संघटनेचे सुशेन ननवरे, सागर इंगळे, श्रीमंत गवळी, राम बडे, दत्तात्रय निकम, तानाजी येडे, शरद जगदाळे, रविंद्र काळे, राहूल कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेची ग्रामस्वच्छता अभियानाच्या विभागीयस्तर समितीकडून पाहणी करण्यात आली. यामध्ये गोयेगावच्या जिल्हा परिषद शाळेने बाजी मारली.सोलापूर जिल्हा परिषदेपासून 187 किमी अंतरावर असलेली दोन शिक्षकी शाळा मात्र चांगल्या कामामुळे पुणे विभागात सरस ठरली आहे. वृक्षवेली, झाडाच्या कुशीतील अभ्यासिका, मुला मुलींसाठी स्वच्छतागृह, वापराचे व शुध्द पिण्यासाठी पाण्याची सोय, आहारात आठवड्यातून एकदा बिर्याणीचा बेत, तर सर्व झाडांना ठिबक सिंचन, विविधरंगी फुले, भाज्या खराब होऊ नये म्हणून किचनशेडसाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून खास
फ्रिज तीन वर्षा पुर्वी भेट दिला आहे. तत्कालीन सिईओ दिलीप स्वामी यांनी शाळांना लोकवर्गणी जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यातून या
शाळेने आमुलाग्र बदल केला आहे. शाळेतील विद्यार्थांनी वारकरी वेशात दिंडी काढून समितीचे स्वागत केले.
मुळीक यांनी केले कौतुक…
करमाळा तालुक्यातील गोयेगाव शाळेने लोकसहभागातून राबविलेले उपक्रम राज्यातील शाळासाठी दिशादर्शक आहेत, असे मत ग्रामस्वच्छता अभियान समितीचे प्रमुख तथा उपायुक्त विकास विजय मुळीक यांनी व्यक्त केले. या शाळेने वृक्षारोपण, परसबाग, वाचनालय, प्लास्टिकबंदी असे विविध उपक्रम राबविले आहेत. दोन शिक्षक काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोयेगावची प्राथमिक शाळा आहे. या गावाने सांडपाणी व्यवस्थापन चांगले केले आहे, असेही उपायुक्त विजय मुळीक यांनी साॅगितले. सहाय्यक आयुक्त डॉ.सोनाली घुले यांनी गोयेगावची शाळा राज्यात आदर्श असल्याचे सांगितले.
स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत सर्व गोयेगाव ग्रामस्थ व विद्यार्थाना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वचेछतेची शपथ दिली. शाळेत योगदान देणारे शिक्षकांचा सन्मान उपायुक्त विजय मुळीक यांचेहस्ते करण्यात आला. विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक अमोल सरडे यांनी आभार मानले.