सोलापूर : लाडक्या बहिणीने भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सोलापुरात येत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेपासून बरेच इच्छुक बेरोजगार वंचित राहिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लाडक्या बहिणीने भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मंगळवारी सोलापुरात येत आहेत. लाडक्या बहिणीच्या सभेसाठी होम मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातून सुमारे 40,000 लाडक्या बहिणी येतील असे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतून निवड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना ही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यात ही योजना अद्यापही यशस्वीपणे राबविली गेली नसल्याची बेरोजगारांची तक्रार आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली वेबसाईट सर्वर डाऊन असल्यामुळे बंदच आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी शासकीय कार्यालयात जाऊन अर्ज केले. यातील बऱ्याच जणांना अद्याप न्याय मिळाला नसल्याची तक्रार आहे. शासकीय कार्यालयाने काही अर्ज स्वीकारले तर काही जणांना परत पाठविले आहे. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची आकडेवारी संशयास्पद वाटत आहे. ही योजना राबविण्याची जबाबदारी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षावर देण्यात आली आहे. पण या विभागाने किती बेरोजगारांचे अर्ज आले व किती जणांना नियुक्ती मिळाल्या याची पडताळणीच केलेली दिसत नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांचे अर्ज संबंधित कार्यालयात प्रलंबित असल्याचे दिसून आले आहे. इच्छुकांना संबंधित कार्यालयाकडून आतापर्यंत दिल्या गेलेल्या नियुक्त्यांचा आढावा घेऊन उर्वरित नियुक्ती देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. पण महिना उलटून गेला तरीही नियुक्त्या दिलेल्या संबंधित जागेवर किती जण हजर झाले याचा ताळमेळ लागलेला दिसत नाही. शासकीय कार्यालयाने जाहीर केलेली आकडेवारी व दिलेल्या नियुक्ती किती याचा आढावा घेतलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर येत असताना त्यांच्या नावाने सुरू करण्यात योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. लाडक्या बहिणीकडे ज्याप्रमाणे लक्ष देण्यात आले त्याप्रमाणे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सुटला नसल्याचे इच्छुक उमेदवारांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांनी स्वतः या प्रश्नी लक्ष घालून प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात अशी त्यांनी मागणी केली आहे.

More Stories
सोलापूर मिनी मंत्रालयाची चावी महिलांच्या हाती; “सोलापूर समाचार’ चे वृत्त तंतोतंत खरे ठरणार
सीईओ कुलदीप जंगम यांचा दणका; नागेश पाटील यांची स्थानांतरण बदली
सोलापूर झेडपीत नवा पायंडा; तदर्थ पदोन्नतीद्वारे मर्जीतील कर्मचाऱ्यांना स्थान