सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर मुंबईहून विमानाने येत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 8 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने होम मैदानकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्यक्रमाला उपस्थिती. कार्यक्रम समाप्तीनंतर दुपारी 2.30 वाजता मोटारीने सोलापूर विमानतळकडे प्रयाण. व दुपारी 2.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.

चाळीस हजार महिला लाभार्थी

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभरातून 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रत्येक कामाची व करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची अत्यंत बारकाईने माहिती घेऊन संबंधित विभागांना मार्गदर्शन करत आहेत. महिला लाभार्थी यांची ने- आन करणे, त्यांच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था आरोग्य पथक, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आदी अत्यंत काटेकोरपणे सर्व संबंधित यंत्रणा काम करत आहेत. एकंदरीत प्रशासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेले आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून व तालुक्यातील गावांमधून महिला लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन येणे व पुन्हा शोधणे यासाठी साडेतीनशे पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसेस पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर शहरातून किमान दहा हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या व्हीआयपीसाठी नॉर्थकोट मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर कार्यकर्त्यांच्या चार चाकी वाहनासाठी हरीभाई देवकरण प्रशाला, स्काऊट गाईड मैदान व संगमेश्वर कॉलेज येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे दुचाकी साठी श्री सिद्धेश्वर मंदिर पार्किंग व हुतात्मा मंदिर पार्किंग येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होम मैदान येथील माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या सभा मंडपाची पाहणी केली. प्रोटोकॉलप्रमाणे सर्व व्यवस्था नियोजित झालेली आहे याची खात्री केली. तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सभामंडपाच्या अनुषंगाने अत्यंत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सर्व यंत्रणा प्रमुखांची बैठकीची होम मैदान येथे घेऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन ती कामे अत्यंत काटेकोरपणे करण्याचे सुचित केले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सभेच्या जागेची व करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. याप्रमाणे संपूर्ण जिल्हा प्रशासन हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *