सोलापूर : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून शेतात नेऊन टाकलेल्या गाळाचे शासनाकडून आलेले अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याकडून 750 रुपयाची लाच घेताना मोहोळ तालुक्यातील खवणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोमनाथ चांगदेव सोनवणे (वय 36 रा.सौंदणे, तालुका मोहोळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
याप्रकरणी खवणे येथील एका शेतकऱ्याने तक्रार केली होती. या शेतकऱ्याने शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून पोखरापूर तलावातील गाळ स्वतः ट्रॅक्टर- टिपर लावून शेतात नेऊन पसरविला होता. अशाप्रकारे तलावातील गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याने नेलेल्या गाळाच्या खेपेप्रमाणे शासकीय अनुदान ग्रामपंचायतकडे पाठवले होते. अनुदानाची ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांला देण्यासाठी खवणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सोमनाथ सोनवणे याने 750 रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस शिपाई गजानन किनगी व चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने ग्रामपंचायतीत जाऊन खातरजमा केली. संबंधित शेतकऱ्याकडून लाच घेताना ग्रामसेवक सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री रंगेहात पकडले व रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.