सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एन आर एच एम अंतर्गत कार्यरत असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सहायिका जुलेखा बिराजदार यांची एकतर्फी सेवा समाप्ती करून अन्याय करण्यात आल्याची कैफियत राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मांडली आहे.
राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रोहिणी सुगंधी, सरचिटणीस काशिनाथ गाडे, राज्य कार्याध्यक्ष संजय उपरे, उपाध्यक्ष वाय. पी. कांबळे, प्रसिद्धीप्रमुख रफिक शेख, विभागीय अध्यक्ष विजय राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे ही कैफियत मांडली आहे. आरोग्य सहायिका जुलेखा बिराजदार या आरोग्य विभागात गेल्या 14 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू आहेत. यातून खोट्या तक्रारी होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी यापूर्वीच तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्याकडे निवेदनाद्वारे कल्पना दिली आहे. असे असतानाही त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवर विधानसभेची आचारसंहिता सुरू असताना सात नोव्हेंबर रोजी एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे. या तक्रारीवर आरोग्य सहायिका बिराजदार यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे विचारात घेणे महत्त्वाचे होते. पण नैसर्गिक न्यायतत्त्वाद्वारे त्यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांच्या सेवेचा विचार करून व कौटुंबिक कलहाचा पुर्व कल्पनेचा आधार घेत, नैसर्गिक न्याय तत्वाप्रमाणे त्यांची सेवा पुनर्स्थापित करावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधीच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हिवाळी अधिवेशनामुळे मी नागपुरात आहे. या कारवाईबाबत मला माहिती नाही. याबाबत माझा संदर्भ कोण दिला हे कळत नाही.
सचिन कल्याणशेट्टी, आमदार