बापरे… जन आरोग्य योजनेचे डॉ. माधव जोशी यांनी स्वीकारली एक लाखाची लाच

सोलापूर : महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी यांनी लॅब चालकाच्या बाजूने अहवाल देण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करून एक लाख लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका रक्त तपासणी करणाऱ्या लॅबच्या मालकाने तक्रार दाखल केली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेतील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील दाखल असलेल्या रुग्णांचे रक्त तपासण्याचे टेंडर तक्रारदाराला मिळाले होते. या टेंडर बाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीचे चौकशीचे काम डॉक्टर जोशी यांच्याकडे होते. त्याने तक्रारदाराला संपर्क साधून विरोधात अहवाल दिल्यास बिल निघणार नाही पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी डॉक्टर जोशी यांनी दोन लाखाची लाच मागितली. यासाठी डॉ माधव जोशी यांनी लॅबच्या मालकाला सोलापुरातील दोन हॉटेलमध्ये तडजोडीसाठी चर्चेला बोलावले. पॉझिटिव्ह अहवाल देण्यासाठी पहिला हप्ता म्हणून एक लाखावर तडजोड झाली. दरम्यान डॉक्टर जोशी व तक्रारदार यांच्यातील चर्चेचे एका माहिती कार्यकर्त्यांने स्टिंग ऑपरेशन केले व याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती. लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी तक्रार व संबंधित स्टिंग ऑपरेशनमधील रेकॉर्डिंगची खातरजमा केली व सापळा लावला. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी डॉक्टर जोशी यांच्या लाचेचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल करूनही त्यांना फरक पडला नाही हे विशेष. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी डॉक्टर जोशी यांच्याविरुद्ध सापळा लावला. यात डॉक्टर जोशी यांनी एक लाखाची लाच घेतल्यावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे.