
सोलापूर : “पाटील, तुम्ही सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळेच संपूर्ण राज्यात जनजागृती झाली असून गावोगावी कुणबी नोंदी सापडत आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रही मिळू लागले आहे. ही सर्व आपलीचं देण आहे,” अशा शब्दात माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्याकडे व्यक्त केल्या.
मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी प्रवर्गही असून राज्यातील अनेक भागात असलेल्या कुणबी नोंदी शोधून तेथील कुणबी समाजालाही ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या. माढा तालुक्यातील ११७ गावांमध्ये तब्बल १९ हजार ४३३ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ३९६ लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटपही करण्यात आले आहे तर अनेक प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबतीत उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार विनोद रणवरे यांचे सहकार्य लाभल्याचे मराठा सेवा संघाच्या शिष्टमंडळाने यावेळी मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच कुणबी दाखले मिळाल्याने अनेक बांधवांना शैक्षणिक प्रवेश, नोकरीत फायदा झाल्यामुळे मराठा बांधवांनी आपले आभार मानल्याचे मराठा सेवा संघाच्या शिष्टमंडळाने सांगितले.
माढा तालुक्यातील अनेक बांधवांना आपण स्वतः कुणबी असल्याची कल्पनाही नव्हती, मात्र मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनानंतर शासकीय नोंदी तपासल्या असता अनेक लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.या सर्व नोंदी सापडण्यामागे मनोज जरांगे-पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे मराठा सेवा संघ माढा तालुक्याच्यावतीने मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, कार्याध्यक्ष रामभाऊ मिटकल यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन मराठा सेवा संघाच्यावतीने त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या आंदोलनाला पहिल्यापासूनच सक्रिय पाठिंबा असून यापुढेही त्यांना साथ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अभिवचन देण्यात आले.