सचिन कल्याणशेट्टींना गुद्धा, कोठेंची कानात कुजबुज; पालकमंत्री गोरे यांची डिप्लोमाशी

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातील राजकारणाशी मिळते जुळते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोलापूरच्या दुसऱ्या भेटीत त्यांनी सर्व आमदारांशी सलोख्याचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या दौऱ्यात नियोजन भवनात त्यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना पोटात मारलेला गुद्धा व सोलापूर शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी केलेली कुजबूज याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री निवडताना अधिक काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री निवडीला उशीर झाल्यामुळे अनेक कामे खोळंबली होती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांनी सोलापूरचा दौरा अत्यंत सावधपणे केल्याचे दिसून येत आहे. सोलापूरच्या दौऱ्यावर येताना त्यांनी सर्वच आमदारांना संपर्क केला. विशेष करून दोन्ही देशमुख यांना निमंत्रण देण्यास ते विसरले नाहीत. आढावा बैठक व त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहताना त्यांनी सर्वांना बोलावले. मंत्रीपदाच्या शर्यतीत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव आघाडीवर होते. पण सोलापूरला न्याय मिळाला नाही. दुसऱ्या विस्तारात कल्याणशेट्टी राज्यमंत्री तरी मिळेल अशी अजूनही कार्यकर्त्यात चर्चा आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या राजकारणाचे त्यांनी पाठ गिरवून दिल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री गोरे यांच्या दौऱ्यात सावलीप्रमाणे ते त्यांची पाठराखण करताना दिसून येत आहेत. कोणता नेता भेटायला आल्यावर काय करायचे? काय बोलायचे? कोणाचे काय काम आहे? याची पालकमंत्र्यांना खडानखडा माहिती दिली जात आहे. सर्वांना जुळवून घेण्याचे पालकमंत्री गोरे यांचे कसब त्यांच्या दोन भेटीत दिसून आले आहे. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत चहापानाचा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी त्यांच्या कक्षात आमदार कल्याणशेट्टी व कोठे गप्पा मारत बसले होते. यावेळी हात मिळवत कल्याणशेट्टी यांनी काहीतरी बोलल्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी जोरदार हास्य करीत कल्याणशेट्टी यांचा हात धरून त्यांना जवळ घेत पोटावर हलकासा गुद्दा मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर हळूच आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्या कानात काहीतरी कुजबूज केल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही दृश्यानंतर पालकमंत्री कमालीचे आनंदात येत हास्य करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय वातावरणाशी मिळते जुळते घेत आपली कारकीर्द यशस्वी करण्याची पालकमंत्री गोरे यांची शिष्टाई यशस्वी होताना दिसून येत आहे.
आता 30 जानेवारी रोजी जिल्हा नियोजनची सभा ठेवण्यात आली आहे. मार्च अखेरच्या विकास कामांना खर्ची टाकण्याचे विषय मंजूर करणे व निधी शिल्लक राहू नये याची काळजी घेण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जाते. पण या बैठकीत विरोधी पक्षाचे खासदार व आमदार जिल्ह्याचे काही वादग्रस्त विषय आणतात का याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे व इतर विरोधी पक्षाचे आमदार सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नावर आक्रमक होतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच सोलापूरचा पाणीप्रश्न, विमान सेवा या महत्त्वाच्या विषयावर पालकमंत्री गोरे यांनी पहिल्याच भेटीत भाष्य केले आहे.