सोलापूर : शिक्षण विस्तार अधिकारी शोभा पांडुरंग हंडे यांनी शिक्षक पदापासून आपल्या शैक्षणिक सेवेची सुरूवात करून मुख्याध्यापक ते शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत केलेली शैक्षणिक सेवा आदर्शवत असल्याचे माढा तालुक्याचे नेते रावसाहेब नाना देशमुख यांनी सांगितले.
पंचायत समिती कुर्डूवाडीच्या शिक्षण विस्तार अधिकारी शोभा हंडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवापुर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन कुर्डूवाडीतील कुबेर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी रावसाहेब नाना देशमुख बोलत होते. यावेळी देशमुख म्हणाले की,शोभा हंडे यांनी आपल्या शैक्षणिक सेवेत शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थी घडविले. ते विद्यार्थी आज उच्चपदस्थ आहेत. मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून उत्तम रीतीने प्रशासन चालविले व आपले कुटुंबही घडविले. त्यांची मुलगा- सुन डॉक्टर,तर मुली-जावई अधिकारी आहेत.त्यांनी एक संस्कारी, आदर्शवत कुटुंब घडविले. समाजाने त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विनायकराव पाटील, माढा तालुक्याचे नेते रावसाहेब नाना देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य तथा विठ्ठलगंगा फार्मर कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष धनराज शिंदे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, भ. क. ल वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मानसिंगराव घाटगे, माजी विस्तार अधिकारी अॅड. भगवानराव पाटील, मधुकरराव लोंढे-पाटील,ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण कांबळे, माजी सैनिक संघटनेचे माढा तालुका सचिव मेजर अरूण जगताप, माजी सरपंच संजय लोंढे, प्रियंका आतकर डॉ.लकी दोशी, अंबुताई इतापे, चंदाराणी आतकर, सिमिंता कुंभार यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक,मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शोभा पांडुरंग हंडे यांचा सेवापुर्ती निमित्त तुळशीहार व १००० वह्या, पुस्तके भेट देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी लक्ष्मण कांबळे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, माजी आमदार विनायक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष जाधव यांनी तर सुत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने पुस्तक विक्रीचा स्टॉल लावण्यात आला होता.
२०२१ वह्या दिल्या भेट
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शोभा हंडे यांचे चिरंजीव, रेडिओलॉजिस्ट डॉ.पंकज हंडे व कार्यक्रमाचे संयोजक मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनी पुषगुच्छ, हार, फुले न आणता वह्या आणाव्यात असे आवाहन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला व या कार्यक्रमात तब्बल २०२१ वह्या जमा झाल्या असून त्या तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे माजी केंद्रप्रमुख पांडुरंग हंडे यांनी सांगितले.