
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दहावी बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरा, व्हिडिओ शूटिंग बरोबरच प्रत्येक पर्यवेक्षकाच्या खिशातील मोबाईलवर झूम मीटिंगच्या कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी दक्षता समितीची बैठक घेतली. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात येत असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले. 1972 पासून बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. या कालखंडानंतर पहिल्यांदाच कॉपीमुक्त अभियानासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करण्यात येत आहे असे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले. जिल्ह्यातील 147 संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर असणार आहे. परीक्षा केंद्र बाहेरून कॉफीचा पुरवठा होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जाणार आहे. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या एक किलोमीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, ऑनलाइन सेवा केंद्र परिक्षा काळात बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील स्थितीचे व्हिडिओ चित्रीकरण होणार आहे. पण त्याही पुढे जाऊन प्रत्येक हॉलवरील पर्यवेक्षकांच्या मोबाईलवर झूम मीटिंगची लिंक दिली जाणार आहे. यासाठी वॉररूम स्थापन करण्यात येणार असून यातून झूम मीटिंगचा कॅमेरा सुरू करून पूर्ण हॉलवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.
महसूलची पथके मदतीला…
कॉपी तपासणीसाठी जिल्हा परिषद व शिक्षण शिक्षण खात्याबरोबरच महसूलमधील तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक यांचे बैठे पथक परीक्षा केंद्रावर असणार आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा तयार असल्याचे शिक्षणाधिकारी जगताप यांनी सांगितले.
दक्षता समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा दक्षता समितीचे सचिव शिक्षणाधिकारी जगताप यांनी जिल्ह्यामध्ये इयत्ता 12 वीची 121 व इयत्ता 10 वीची 184 परीक्षा केंद्रे आहेत अशी माहिती दिली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात इयत्ता 12 वी साठी 11 व इयत्ता 10 वीसाठी 15 परिरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत. त्यावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय व्ही.सी.मध्ये 1982 च्या कायद्याची कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करणेसाठी सर्व ती आवश्यक यंत्रणेचा वापर करावा. व याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत असे स्पष्ट केले.
इयत्ता 12 वीची परीक्षा दिनांक 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच इयत्ता 10 वीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.
इयत्ता 12 वीसाठी 55 हजार 879 व इयत्ता 10 वीसाठी 65 हजार 585 इतके विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. या परीक्षा केंद्रांसाठी केंद्रसंचालक नियुक्ती करण्यात आलेले असून जिल्ह्यात इयत्ता 12 वीसाठी 34 व इयत्ता 10 वीसाठी 47 संवेदनशील केंद्रे आहेत अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांनी बैठकीमध्ये दिली. या परिक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त व बैठे पथक नेमण्यात आलेले आहे. या परिसरात 144 कलम लागू करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीस आयुक्त शहर व पोलीस अधीक्षक, ग्रामीणच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. संवेदनशील केंद्रावर व ज्याठिकाणी मास कॉपी चालते त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडीओग्राफीसाठी व्हिडीओग्राफर उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.
तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांचेमार्फत तहसिलदार, नायब तहसिलदार यांचेकडून फिरते पथक व बैठे पथक नियुक्त करण्यात येतील त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी यांची व इतर आवश्यक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. तर मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचेमार्फत जिल्हा परिषदेतील खातेप्रमुखांची फिरते पथकामध्ये नियुक्त करण्यात येईल. संवेदनशील परीक्षा केंद्र अथवा गाव जेथे 144 कलमाची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येईल व गावातील प्रतिष्ठित 4 ते 5 लोकांचे संपर्क क्रमांक घेवून त्यांचेकडून गावातील याबात माहिती घेतली जाईल. एका ठिकाणी कंट्रोल रूम तयार करण्यात येईल. ज्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद विभाग, पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांचे प्रतिनिधी नियुक्ती करण्यात येतील. यामार्फत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर विशेषत: संवेदनशील केंद्रावर लक्ष ठेवण्यात येईल. ज्या परिक्षा केंद्रावर गैरकृत्य आढळून आल्यास फिरते पथकास व पोलीस विभागास माहिती दिली जाईल व संबंधितावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तसेच परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोगय सेवा पुरविणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सुचना देण्यात आली. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या परीक्षा केंद्रावर बैठे आरोगय पथक व तालुक्यात एक फिरते आरोग्य पथक नियुक्त करण्यात यावे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आदेश दिले.
या परीक्षांसाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), वेळापूर, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना जिल्हा परिषद, सोलापूर यांचेही फिरते पथक सक्रिय राहील अशा सुचना दिलेल्या आहेत.या दक्षता समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस आयुक्त शहर व पोलीस अधिक्षक ग्रामीण यांचे प्रतिनिधी, प्राचार्य जिल्हा परिषद, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, सहा. शिक्षण उपनिरीक्षक उच्च माध्यमिक सोलापूर उपस्थित होते.शिक्षणाधिकारी जगताप यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.