मराठी कालगणना हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिकेचे प्रकाशन

सोलापूर : श्री शंभुराजे राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला व यावेळी मराठी कालगणना हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिकेचे प्रकाशन कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते करण्यात आले.
औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत 9 वर्षे सळो की पळो करुन सोडणाऱ्या व त्याच्या नजरेला नजर भिडवुन “धर्म मतलब आस्था और आस्था कभी बदली नही जाती’ असे सांगणाऱ्या धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन माघ शुद्ध सप्तमी (तिथीनुसार) ४ फेब्रुवारी रोजी दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषात संपन्न झाला.शंभुराजे राज्याभिषेक सोहळा माघ शुद्ध सप्तमी आंग्ल दिनांक ४ जुन रोजी रायगडावर श्री शंभुराजाभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांच्या सौजन्यातुन मोठ्या उत्साहात जल्लोषात राज्याभिषेक सोहळा पार पडला. परकीय सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर भगवा रोवुन शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण करुन स्वतःचे राज्याभिषेक शक चालु केले. या शकाची प्रेरणा घेऊन मारुती सिंधुबाई दिगंबर सुरवसे यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्रातील पहिली मराठी कालगणना हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिका प्रकाशन कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प अनिकेत मोरे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिकेचे संकल्पक मारुती सुरवसे यांनी या तिथीदर्शीकेची मराठी संस्कृती, आपली परंपरा जोपासण्यासाठी मराठी कॅलेंडर महाराष्टात प्रकाशित होवो ही तमाम शिवप्रेमींची इच्छा होती, ती पुर्ण करण्याचा मी संकल्प केला. श्री शिवछत्रपती यांच्या विचारधारेवर कार्य करणारे शिवसेवक निश्चितच याचा स्वीकार करतील. प्राॅमिस डे, मदर डे, ३१ डिसेंबर असे परकीय सण साजरा करुन व परकीय कालगणना वापरून आपलीच संस्कृती आपण संपवत चाललोय. त्याआधी आपली संस्कृती, परंपरा आपल्याला जोपासणे गरजेचे आहे. हिंदु धर्मातील १८ पगड जाती १२ बलुतेदार लोकांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य निर्माण केले. तसेच माता भगिनींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढुन परस्त्री मातेसमान ही प्रेरणा प्रत्येकाच्या मनात रुजवून, गोमातेचे रक्षण केले. देव, देवतांच्या मंदिराचे रक्षण केले. त्याचप्रमाणे महाराजांनी इस्लामी जुलूस व ज्युलियन कालगणना नाकारुन हिंदू राजांनी ज्याप्रमाणे आपल्या नावे ‘शालिवाहन शक’ आणि ‘विक्रम संवत्सर’ सुरू केले. अगदी तसेच शिवरायांनी ‘राज्याभिषेक शक’ सुरु केला. ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शक १५९६ या दिवसापासुन स्वराज्याच्या पत्राची सुरुवातच पुढे ‘स्वस्तिश्री शिवराज्याभिषेक शके’ या ओळीने होत असे. श्री शिवछत्रपती परंपरेचा वारसा, विचार, संस्कार, संस्कृती जोपासणे ही काळाची गरज. म्हणुनच शिवविचाराशी तडजोड न करता त्यांची परंपरा जोपासण्यासाठी हिंदवी स्वराज्य तिथीदर्शिका प्रत्यक्षात हिंदू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले.
यावेळी शिवशंभु विचार मंचचे सुधीर थोरात, शंभुव्याख्याते अक्षय चंदेल, शंभुराजाभिषेक समितीचे अध्यक्ष सिद्धेश मोरे, सिद्धेश सुर्वे, पवन नगरकर, शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे अध्यक्ष मारुती सुरवसे, उपाध्यक्ष अशोक झाडे, साक्षी कुंदनानी, मयुरी जायप्पा आदी शिवसेवक परिवार उपस्थित होते.