प्राथमिक शाळांच्या परीक्षा कधी? आता लागा तयारीला

सोलापूर : बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. त्यामुळे परीक्षांच्या या काळात प्राथमिक शिक्षण विभागाच्या परीक्षा कधी? असा पालकांना प्रश्न पडला आहे. पण प्राथमिक शिक्षण विभागाच्या परीक्षा ही आता लवकर सुरू होणार आहेत.
पुणे बोर्डाने बारावीच्या परीक्षा सुरू केल्यामुळे सध्या जिल्ह्यात परीक्षेचे वातावरण सुरू आहे. पुढील आठवड्यात दहावीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांमध्ये परीक्षांची तयारी सुरू झाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ सुरू झाले आहेत. दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाकडे थोडे दुर्लक्ष होणार आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे मुलांचा खेळाकडे ओढा लागला आहे. गल्लीतील आयपीएल व टीव्हीवरील कार्यक्रमाकडे मुलांचे लक्ष जाणे स्वाभाविकच आहे. पण प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापक संघाच्या सहकाऱ्यांने परीक्षेची तयारी सुरू केली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून या परीक्षा सुरू होतील अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासात गुंतवून ठेवणे महत्त्वाचे आहे. एप्रिलमध्ये परीक्षा पार पडल्यानंतर मे महिन्यात मुलांना सुट्टीचा आनंद घेता येणार आहे. सध्या नववीत असलेल्या मुलांना पुढील वर्ष दहावीचे असणार आहे. त्यामुळे या मुलांना आत्तापासूनच क्लासची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे पालकांना परीक्षांच्या वेळापत्रकांपासून गाफील राहता येणार नाही