
सोलापूर : सोलापूर शहराच्या विविध नागरी प्रश्नांबाबत आमदार देवेंद्र कुठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांची निवेदने दिली. या मागण्यांची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देत कामांच्या पूर्ततेबाबत सूचना दिल्या.
सोलापूर शहरात असणाऱ्या अक्कलकोटरोड एमआयडीसी आणि होटगीरोड एमआयडीसी येथील उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील उद्योजकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे येथील प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी केली होती. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेटही घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे शहरातील दोन्ही एमआयडीसीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयासाठी नवी एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाला केली होती. या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास एमआरआय मशीन देण्याचे आदेश दिले आहेत.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी वनविभागाची जागा हस्तांतरित करण्याची आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे मांडली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला असून शासन पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले. आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासकामात लक्ष घातल्यामुळे सोलापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी घेतले विकासाचे पालकत्व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे राजकीय पालकत्व घेतल्यामुळेच मला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या राजकीय पालकत्वाबरोबरच सोलापूर शहराच्या विकासाचेही पालकत्व घेतले आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाला नव्याने गती मिळणार आहे.
– देवेंद्र कोठे,आमदार, शहर मध्य