
सोलापूर : शिक्षण महर्षी व माजीमंत्री कै. दि. शि. कमळे गुरुजी यांनी विशाल दृष्टिकोन ठेवून मंद्रूप येथे सुरू केलेल्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये समाजकल्याण अधिकारी, शिक्षक, अभियंता आणि जिल्ह्यात नाव करणारे पत्रकार घडले, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका रेणुका दशवंत यांनी केले.
मंद्रूप येथील महात्मा फुले विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फौजदार डांगे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर मोरे उपस्थित होते.स्वागत गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे फौजदार डांगे व प्राचार्य मोरे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुख्याध्यापिका दशवंत यांनी शाळेची प्रगती सांगितली. 80 च्या दशकात मंद्रूप परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिक्षण घेणे अवघड होते. विद्यार्थ्यांची गरज ओळखून कमळे गुरुजींनी ही पूर्व माध्यमिक शाळा सुरू केली. या शाळेत बी. जे. नदाफ, सिकंदर नदाफ, अर्जुने, काळे, कदम, बुळगुंडे, लायने, पाटील, वडापूरकर, देशपांडे,व्हनमाने,बबलेश्वर, डी. एन. गायकवाड, पोतदार, जाधव व खंदारे मॅडम अशा मान्यवर शिक्षकांनी सेवा देऊन विद्यार्थी घडविले. समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, धाराशिव जिल्ह्यात पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून सेवा देणारे हाजीमलंग शेख, पत्रकार म्हणून जिल्ह्यात नावाजलेले राजकुमार सारोळे, प्रसिद्ध गायक मो. आयाज, परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक अनिल शिंदे हे विद्यार्थी महात्मा फुले विद्यालयातच घडले. या मान्यवर व्यक्तींप्रमाणेच दहावीच्या या विद्यार्थ्यांनी नवीन स्वप्न पाहत आपले भवितव्य उज्वल करावे, अशी अपेक्षा मुख्याध्यापिका दशवंत यांनी व्यक्त करीत दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार तेली यांनी केले तर सूत्रसंचालन कु. अदिती पुजारी व कु. समृद्धी म्हेत्रे यांनी केले. शेवटी कु. प्रणिती वाघमारे हिने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आर. एम.कमळे, एस. एस. कोळी, स्वप्निल हासापुरे, अश्विनी जाधव, मुकेश अडसूळ एम.के. शेख, सुनील टेळे, भालचंद्र शिंदे, शिवशंकर रावत, पी. ए. पाटील, शिक्षकेतर कर्मचारी प्रवीण पोतदार, मनोज बनसोडे, विशाल कांबळे यांनी परिश्रम घेतले.