March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

बापरे…सोलापुरात बोगस माजी स्वातंत्र्यसैनिक दाखवून मिळवली गुरुजीची नोकरी

सोलापूर : माजी स्वातंत्र्य सैनिकाच्या यादीत नाव नसताना बोगस प्रमाणपत्र सादर करून सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात दोघा शिक्षकांनी नोकरी मिळवल्याची तक्रार शरद धर्मा गायकवाड, (रा. कामती (बु) ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे  केली आहे

विजयकुमार बसवणप्पा गुंडद, व  राजशेखर धानप्पा गोब्बुर अशी त्या दोन शिक्षकांची नावे आहेत. या दोन शिक्षकांनी अनुक्रमे दिनांक 2/11/1993 व 12/10/1992 ला हंगामी स्वरूपात शिक्षक म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात नियुक्ती मिळवली. नियुक्ती होते वेळेस त्यांनी स्वातंत्र्यसैनिक पाल्यच्या कोटयातून ही नोकरी मिळवली. ही नोकरी मिळवताना त्यांनी स्वातंत्र्यसैनिकाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून नियुक्ती मिळवल्याची गायकवाड यांनी तक्रार केली आहे.

या दोघांनी स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्याचा बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा संशय आल्यावरून गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकारात स्वातंत्र्यसैनिकाची यादी मागितली. त्याचबरोबर या  दोन्ही शिक्षकांची कागदपत्रे, सेवा पुस्तक तपासले असता त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक पाल्य म्हणून सेवेत नियुक्त झालेले दिसून येत आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माजी स्वातंत्र्य सैनिक यांची रितसर यादी मागणी करून पाहिले असता या यादीत बसवणप्याः इरप्पा गुंडद, धानप्पा सिदमलप्पा गोब्बुर (दोघे रा. मैदर्गी, ता. अक्कलकोट) या दोघांचे नांव दिसून येत नाही. या दोन्ही शिक्षकांनी शासनाची फसवणूक करून बोगस सर्टीफिकेट सादर करून नोकरी मिळवली व आतापर्यत नोकरीत कार्यरत आहेत, असे गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

चौकशीत तथ्य बाहेर येणार

गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांकडे याबाबत तक्रार दाखल केले असले तरी चौकशीनंतर या दोघा शिक्षकांनी नोकरी कशी मिळवली हे सत्य बाहेर येणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत आतापर्यंत कर्णबधिर असल्याचे प्रमाणपत्र सादर करून काही शिक्षकांनी पदोन्नती मिळवली अशी तक्रार आहे. अनिल देशपांडे यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. बीड जिल्हा परिषदेने अशा शिक्षकांवर कारवाई केली मात्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अद्याप या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. अशात आता बोगस स्वातंत्र्य सैनिकाचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.

संबंधीत दोन्ही शिक्षकांचे खातेनिहाय चौकशी करून सदर शिक्षकांना बडतर्फ करून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. आत्तापर्यत त्यांनी घेतलेले वेतन वसूल करावे. अन्यथा  जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसणार आहे.

 शरद गायकवाड, तक्रारदार