सोलापूर झेडपी शिक्षकांचा बिंदू नामावलीचा प्रश्न लवकर सुटणार
आमदार अभिजीत पाटील यांनी घेतली सीईओ कुलदीप जंगम यांची भेट

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावलीसंदर्भात आमदार अभिजीत पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची शुक्रवारी भेट घेऊन चर्चा केली. बिंदू नामावलीवर काम सुरू असून लवकरच हा प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन सीईओ जंगम यांनी दिले.
सन 2022 पासून शिक्षकांच्या बिंदू नामावलीसंदर्भात सातत्याने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या माध्यमातून धरणे आंदोलन व वारंवार पाठपुरावा भेटी देऊन बिंदू नामावलीच्या संदर्भातल्या त्रुटी दूर करण्याबाबतची भूमिका घेतली होती. शुक्रवारी आमदार अभिजीत पाटील यांनी याबाबत सविस्तर आढावा घेऊन शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत प्रशासनाची भूमिका समजून घेऊन शिक्षकांच्या बिंदू नामावली तात्काळ मंजूर करून सोलापूर जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या शिक्षकांचा मार्ग खुला करावा, अशी ठोस भूमिका मांडली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत यावर प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून लवकरच बिंदूनामावली मंजूर होईल आणि लवकरच याबाबत सकारात्मक परिस्थिती आपणा सर्वांना दिसेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सामाजिक कार्यकर्ते अतुल चव्हाण, तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्यकारणी सदस्य व बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.