झेडपीचे “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू ” अभियान 

Rajkumar Sarole
3 Min Read

सोलापूर : राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” अभियान जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवून गावातील कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करावे. या अभियानात हालगर्जी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने दि. १ मे ते १५ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.” कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू !” वाटचाल दृष्यमान शाश्वत स्वच्छतेकडे या नावाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या २९ एप्रिल रोजी सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक बोलाविण्यात आलेली आहे.

गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना दृष्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणेसाठी ग्रामीण जनतेच्या स्वच्छता विषयक वर्तणूकित बदल घडवून आणण्यासाठी हे या अभियानाचे मुख्य उदिष्ट आहे. गावातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करून सार्वजनिक स्वच्छताविषयक बाबीची लोकांमध्ये जाणीव जागृती करणे, घनकचऱ्याचा पुनर्वापर करणे, पर्यावरण पूरक उपाय योजना करणे साठी १३८ दिवसाचे हे विशेष अभियान सुरु केले आहे.या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेवून तालुकानिहाय नियोजन सादर करणेबाबत आदेशित केले आहे.

अभियानाच्या पूर्व तयारीसाठी गाव पातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालयासह गावातील दर्शनी भागात नोटीस लावून याबाबत माहिती देणे, अभियान पूर्व गावातील घरगुती व सार्वजनिक स्तरावरील ओला व सुका कचरा संकलित करून ठेवणे, व दिनांक १ मे रोजी गावात ग्रामसभा घेवून अभियानाची माहिती देवून सदरील गोळा केलेला ओला कचरा नॅडेप खड्ड्यात जमा करून अभियानाची सुरुवात केली जाणार आहे.सदरील कचऱ्यावर प्रकिया करून खड्डयात सेंद्रिय खत निर्माण केला जाणार आहे.तालुका स्तरावर नियंत्रण सदरील अभियान कार्यक्रमाचे नियंत्रण गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.प्रकल्प संचालक यांनी ५ टक्के गावाची तपासणी करणे तर गट विकास अधिकारी यांनी तालुक्यातील संख्येच्या ५ टक्के तपासणी करणे अवश्यक आहे.दोन विस्तार अधिकारी यांच्या मार्फत २० ते ४० टक्के तर तालुका संपर्क सल्लागार यांनी १० टक्के तपासणी करणे अनिवार्य राहणार असून उर्वरित गावात गट समन्वयक यांनी पाहणी करणे आवश्यक राहणार आहे.

या अभियानात लोकप्रतिनिधीं, अधिकारी कर्मचारी यांच्यासह गावातील महिला बचतगट, युवक मंडळे यांच्या सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील अभियानाचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शन खाली प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, गटविकास अधिकारी व जिल्हा कक्षातील सल्लागार करत आहेत.या अभियानचा उद्देश गावातील कचऱ्याचे निर्मूलन करणे, दृष्यमान स्वच्छता विषयक बाबीत सुधारणा करणे, गाव पातळीवर नॅडेप पद्धतीचा अवलंब करणेत येणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) अमोल जाधव यांनी सांगितलें.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *