March 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आरोपी मनीषा माने हिच्याविरुद्ध 27 कर्मचाऱ्यांच्या तक्रारी

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी मनिषा महेश माने उर्फ मुसळे (वय-45 वर्ष, रा-80, बसवराज नेले नगर, जुळे सोलापुर) हिला आणखी 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी बुधवारी दिला.

सदर बाझार पोलिसांनी डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपी मनीषा हिला रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले.आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे, श्रीपाद देशक, सिद्धाराम पाटील तर सरकारतर्फे शिल्पा बनसोडे यांनी बाजू मांडली.

पहिल्यांदा न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर आरोपीतर्फे बाजू मांडण्यात आली. एफ.आय.आर. चे अवलोकन केले असता आरोपी महिलेने डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले याबाबत कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही. आरोपाप्रमाणे दिनांक 17 एप्रिल रोजी महिला आरोपी मनीषा यांनी डॉक्टर वळसंगकर यांच्या अधिकृत ईमेलवर पत्र पाठवले, त्यामध्ये तिने हॉस्पिटलमध्ये तिचे अधिकार कमी केल्याबाबत, तिचा पगार कपात केला जातो, वगैरे त्यामुळे ती आत्महत्या करणार असून त्यामध्ये डॉक्टर वळसंगकर यांचे नाव घेणार आहे, अशा आशयाचा मेल पाठवला. तदनंतर दिनांक 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर व त्यांच्या पत्नीने आरोपी महिलेस हॉस्पिटलमध्ये बोलावून समजावून सांगितले, त्यावेळी आरोपीने तिची चूक झाल्याचे सांगून माफी मागितली, पत्र फाडून टाकले, तदनंतर सायंकाळी डॉक्टर वळसंगकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.डॉक्टरांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये नमूद आहे की, “ज्या माणसाला मी शिकवून आज A.O. केले आहे आणि चांगला पगार देतो आहे त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, याचे मला आतीव दुःख आहे आणि म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.” सदर चिट्ठीच्या आधारे आरोपी महिलेला सदर बझार पोलिसांनी अटक केली आहे. तपास अधिकारी पो. नि. लकडे यांनी चिठ्ठी जप्त करावयाची आहे, प्रकरणाचा तपास करावयाचा आहे, ईमेलद्वारे पाठवलेली सदर चिठ्ठीची प्रत जी महिला आरोपीने फाडली, त्याचे तुकडे जप्त करायचे आहेत, घाणेरडे व खोटे आरोप याबाबत तपास करावयाचा आहे, त्यासाठी पोलीस कोठडी हवी आहे, अशी कारणे मांडली होती. त्यावर न्यायालयाने तिला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलीस कोठडीची बुधवारी मुदत संपल्यानंतर पुन्हा तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आरोपी मनीषा ही वळसंगकर यांच्या रुग्णालयात अधीक्षक म्हणून काम करत होती. या काळात तिच्याविरुद्ध   रुग्णालयातील 27 कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. यात तिने कामावरून काढण्याची धमकी देणे, पैशाची मागणी करणे अशी वेगवेगळी कारणे असल्याचे नमूद केले. या प्रकरणांचा तपास करण्यासाठी आणखी तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळावी, अशी तपास अधिकाऱ्यांनी मागणी केली. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा व गुन्ह्याशी संबंध नाही. तपास झालेला आहे त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केली. पण न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस तपासासाठी आरोपी मनीषा हिला आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

पुरावे फॉरेन्सिक लॅबकडे 

पोलिसांनी जप्त केलेले पिस्तूल, रक्ताळलेले कपडे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. तसेच चिट्टीतील हस्ताक्षरांचीही पडताळणी करण्यात येणार आहे. मोबाईलवरील संभाषण व्हाट्सअप चॅटिंग याचीही पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.