सोलापूर : “*मातृत्व*” हा भारतीय जैन संघटनेच्या पायाभरणी कार्यक्रमांच्या मालिकेतील पाचवा पायाभरणी कार्यक्रम आहे. जैन समाजात आईचे महत्त्व पटवून देणे, कौटुंबिक नाते दृढ करणे आणि समाजात मातेबद्दल आदराची भावना वाढवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन .जिल्हाध्यक्षा प्रविणा सोलंकी यांनी केले.
जागतिक मातृत्व दिनानिमित्त या मालिकेत 11 मे रोजी भारतीय जैन संघटना महिला जिल्हा विभाग सोलापूर (महाराष्ट्र) तर्फे *मातृत्व* कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील सहा मातांना साडी, नारळ व पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आईप्रमाणे असलेल्या मुख्याध्यापिका वसुंधरा शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. अनाथ मुलांसाठी आश्रम चालवणाऱ्या शिक्षिका लक्ष्मी पाटील, वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री-पुरुषांची सेवा करणाऱ्या श्रीलक्ष्मी चव्हाण, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ओळखून स्वावलंबी झालेल्या तुलसी भीमनपल्ली आणि माधुरी चव्हाण, ज्या महिलेने आपल्या जीवनासाठी आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी इतरांच्या घरी सफाई कामगार म्हणून काम केले त्या रुपाली नरळे यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात संतोष बंब यांची महाराष्ट्र राज्य सचिवा व माया पाटील यांची विभागीय अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा महिला विभागातर्फे सत्कार करण्यात आला. राज्य सचिव संतोष बंब यांनी उपस्थित सर्व महिलांना मातृत्व या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रविणा सोलंकी यांनी महिलांशी आईचे महत्व व त्यांच्याप्रती असलेली कर्तव्ये यावर संवाद साधला.
उपस्थित सर्व महिलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात लकी ड्रॉ म्हणून दोन सदस्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केतन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात राज्य सचिवा संतोष बंब, विभागीय अध्यक्षा माया पाटील, जिल्हाध्यक्षा प्रविणा सोलंकी, जिल्हा सचिवा निर्मला मेहता, शहराध्यक्षा कल्पना भन्साळी व इतर सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव निर्मला मेहता यांनी केले तर आभारप्रदर्शन जिल्हाध्यक्षा प्रविणा सोलंकी यांनी केले.