March 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात टॉवेल कारखान्याच्या आगीत आठ जणांचा मृत्यू

सोलापूर : अक्कलकोटरोड एमआयडीसी येथील सेंट्रल टेक्स्टाईल कंपनीमध्ये आग रविवारी पहाटे आग लागून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी दिली आहे.  दुसरीकडे बाळे पुलावर कांद्याचा ट्रक उलटल्याने ट्रॅफिक जाम झाली आहे.

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला आग लागली आहे. या आगीत कारखान्याच्या मालकाच्या कुटुंबीयांसह  8 जणांचा मृत्यू झाला असून अग्निशामनची 10 वाहने आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी 13 तास प्रयत्न करीत 82 बंबाची फवारणी केली. पहाटे तीन ते पावणेचारच्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेचे चीफ फायर ऑफिसर राकेश साळुंखे व एक फायर कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवताना किरकोळ जखमी झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करीत होत्या 13 तासाने आग आटोक्यात आली पण आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये उस्मान मंसूरी (वय 78), अनस मंसुरी (वय 24), शिफा मन्सुरी (वय 20), युसूफ मंसूरी (वय एक वर्ष), मेहताब बागवान (वय 51), आयेशा बागवान (वय 45), हिना बागवान (वय 35) आणि सलमान बागवान (वय 18) यांचा समावेश आहे. एक वर्षाचा युसूफ आईच्या कुशीत होता. हे दृश्य पाहून अनेकांचे मन हेलावले. या घटनेची पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली.

एकीकडे आगीच्या या घटनेचे चर्चा सुरू असतानाच तर दुसरीकडे बाळे पुलावर कांदा वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे. यामुळे तुळजापूर, हैदराबाद व पुणे महामार्गावरील वाहतूक जाम झाली होती. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक जामचा फटका बसला आहे. उलटलेला ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना चार तास लागले आहेत.