सोलापूर : मंगळवेढा पोलीस ठाण्यात सन 2019 मध्ये दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मंगळवेढा यांच्या न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत तीन वर्षे सक्तमजुरी व एकूण 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 128/2019 अन्वये भा.दं.वि. कलम 354, 504, 506 व 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि. 14 मार्च 2019 रोजी आरोपी शंकर उर्फ दादा बसवेश्वर बुरजे याने फिर्यादी महिलेचा विनयभंग करून तिच्या शीलाचा अपमान होईल असे कृत्य केले. तसेच तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दि. 15 मार्च 2019 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी करून आवश्यक पुरावे संकलित केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील श्री. स्वप्नील अभंग यांनी सरकारी पक्षाची प्रभावी बाजू मांडली. पैरवी अधिकारी पोलीस हवालदार व्ही. एम. वाघमारे (बक्कल क्र. 1703) तसेच कोर्ट ऑर्डरली पोलीस कॉन्स्टेबल ए. बी. बाबर (बक्कल क्र. 1351) यांनीही न्यायालयीन कामकाजात समन्वय साधला.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती वृशाली पाटील यांनी आरोपीस भा.दं.वि. कलम 354 अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, कलम 504 अंतर्गत सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंड, कलम 506 अंतर्गत सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंड तसेच कलम 509 अंतर्गत एक वर्ष साधी कैद व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व मुख्य शिक्षा एकत्रित (Concurrent) भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, एकूण दंडाच्या 10 हजार रुपयांपैकी पाच हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे व उर्वरित पाच हजार रुपये राज्य शासनाकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
या प्रकरणात फिर्यादी व इतर साक्षीदारांचा पुरावा विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने नमूद केले असून तपासादरम्यान संकलित करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरत आरोपीस दोषी ठरविण्यात आले. हा गुन्हा यशस्वीरित्या सिद्ध होण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बिरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, सहाय्यक सरकारी वकील श्री. स्वप्नील अभंग, पैरवी अधिकारी पोलीस हवालदार व्ही. एम. वाघमारे तसेच कोर्ट ऑर्डरली पोलीस कॉन्स्टेबल ए. बी. बाबर यांनी प्रभावी समन्वय साधला.

More Stories
सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जागेवर दिली डिजिटल अनुकंपा नियुक्ती
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा; फौजदाराची बदनामी पडली महागात