सोलापूर : व्हीआयपी दौरा व बैठका यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना वेळ मिळाला नसल्याने दोनदा गुणवंत विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम रद्द झाला. तिसऱ्यांदा तारीख जाहीर होऊन कार्यक्रम सुरू झाला तरीही सीईओ जंगम व्हीआयपी दौऱ्यात अडकले. त्यामुळे त्यांच्याशिवाय कार्यक्रम सुरू झाल्याने गुणवंत विद्यार्थी नाराज झाले. बीझी शेड्युल असतानाही कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी सीईओ जंगम यांनी हजेरी लावून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.
शिवस्वराज्य दिनानिमित्त शिक्षण विभाग माध्यमिक व मराठा सेवा संघ जिल्हा परिषदे शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेचे कर्मचारी व जिल्हा परिषद बीट पत्रकार यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सिईओ कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्याचे नियोजन केले होते. परंतु सीईओ जंगम यांना वेळ मिळाला नसल्याने दोनदा हा कार्यक्रम रद्द झाला. सोमवार दिनांक 16 जून रोजी गुणवंताचा सन्मान ठरला. मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शाळा प्रवेशाचा कार्यक्रम आटोपून सीईओ या कार्यक्रमाला हजर होणार होते. पण ऐनवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दौरा आला. पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. मंत्र्यांच्या प्रोटोकॉलमुळे सीईओ जंगम यांना या कार्यक्रमाला जावे लागले. त्यामुळे पुन्हा हा कार्यक्रम पुढे ढकलावा असे सूचना समोर आली. पण जिल्ह्यातून गुणवंत विद्यार्थी आल्याने व तुंगत येथील कार्यक्रमास उशीर झाल्याने जिल्हा परिषदेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आला. सन्मान आटोपल्यानंतर समारोपाच्या भाषणावेळी सीईओ जंगम सभागृहात हजर झाले आणि त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारून ते पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. इतक्या व्यापातून धावपळ करीत त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आपली वाट काढली याबद्दल पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, गायक मोहंमद अय्याज, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, उप शिक्षणाधिकारी स्वाती हवेले, कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव दिनेश बनसोडे, सचिन चव्हाण, विशाल घोगरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते. प्रारंभी मोहम्मद आयाज यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आई वडील व गुरुजनांनी दाखविलेल्या मार्गावर विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल ठेवावी, असे त्यांनी आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत मोहिते रवींद्र करजगीकर, रणजीत घोडके, अनिल पाटील श्रीकांत धोत्रे, चेतन भोसले यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी सर यांनी केले व आभार मेहताब शेख यांनी मानले.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ