सोलापूरजिल्हा परिषदपंढरपूर आषाढी यात्रा

Wari: पुण्याच्या स्वच्छतागृहाचे व्यवस्थापन डळमळले पण सोलापूरच्या अधिकाऱ्यानी निर्माण केला पॅटर्न

सोलापूर: आषाढी वारीचा सोहळा निर्विघ्न पार पडला आहे. हा सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली असता, पालखी सोहळ्याबरोबरचे सर्वात किचकट काम स्वच्छतागृहाचे व्यवस्थापन हे होते. पण सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुणे, सातारच्या हद्दीत जाऊन स्वच्छतागृहाचे काय नियोजन होत आहे, याची आधीच पाहणी केली व तेथे झालेल्या चुका दुरुस्त करून सोलापूर जिल्ह्यातील सोहळा व्यवस्थितपणे पार पडला आहे.

आषाढी वारी सोहळा यशस्वी केल्याबद्दल जिल्हा परिषद पत्रकार संघातर्फे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे यांनी जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांचा सन्मान केला. याप्रसंगी बोलताना प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी वारीतील अनुभव सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्यांच्याकडे पालखी सोहळ्याच्या स्वच्छतागृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली होती. स्वच्छतागृहाचे व्यवस्थापन हे सर्वात किचकट काम होय. सीईओ जंगम यांनी सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळा आल्यानंतर कोणतीच समस्या येऊ नये यासाठी दोन्ही पालखी सोहळे पुणे व सातारा जिल्ह्यातून येत असताना काय व्यवस्था आहे, याची पाहणी करण्यासाठी दोन टीम पाठवल्या होत्या. पुणे जिल्ह्यात पाटस व सातारा जिल्ह्यातील बरड येथील व्यवस्थेची आम्ही पाहणी केली. पावसामुळे स्वच्छतागृहाच्या ठिकाणी चिखल झाल्यामुळे वारकऱ्यांना त्रास झाला होता. माऊलीचा पालखी सोहळा वाल्हे येथे मुक्कामी आल्यानंतर ठेकेदार काम सोडून निघून गेले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळा आल्यानंतर मोठ्या अडचणी निर्माण होणार होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दुसऱ्या एजन्सीची मदत घेऊन बरड येथे लागलीच ही समस्या निभावून नेली. पुणे जिल्ह्यात पालखी सोहळा असताना स्वच्छतागृहाच्या व्यवस्थापनाच्या ज्या त्रुटी आढळल्या होत्या त्या त्रुटीची दुरुस्ती केल्यामुळे समस्या निर्माण झाल्या नाहीत. स्वच्छतागृहाच्या ठिकाणी मुरुमाची व्यवस्था केल्याने कोठे चिखल झाला नाही. त्यामुळे पालखी सोहळ्यातील भाविकांनी स्वच्छतागृहाचा चांगल्या पद्धतीने वापर केला. पालखी सोहळ्याबरोबर ग्रामीण भागातील वारकरी असतात. त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करणे माहीत नसते. त्यामुळे एखाद्या वारकऱ्यांनी स्वच्छतागृहाचा वापर करून पाणी फ्लश केले नसल्यास घाण तशीच राहत होती. त्यामुळे पुढील वारकरी त्याचा वापर करीत नसत. असे स्वच्छतागृह लागलीच स्वच्छ करण्याची यंत्रणा उभी केली होती. तसेच पाण्यासाठी सोबत नेलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आतच टाकून दिल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर केल्या. त्यामुळे हा पॅटर्न यशस्वी झाला.

हे काम होते अवघड…

पालखी सोहळा मुक्कामानंतर मध्यरात्रीनंतर पुढच्या मुक्कामी हे स्वच्छतागृह हलविणे अत्यंत जिकरीचे काम होते, असे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले. पालखी सोहळा पुढच्या मुक्कामी पोहोचण्याआधी तिथे ही यंत्रणा उभी करणे गरजेचे असते. स्वच्छतागृहाच्या वाहतुकीसाठी दीडशे ट्रक असतात. त्याचबरोबर सक्क्षण मशीन व इतर वाहने असतात. पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या गर्दीतून या वाहनांना वाट करून देऊन निर्धारित केलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह वेळेत नेऊन बसवणे ही मोठी जबाबदारी होती. आमच्या टीमने ही जबाबदारी पार पाडली. दोन्ही पालखी सोहळ्याबरोबर कोठेच समस्या निर्माण झाली नाही. स्वच्छतागृहाची व्यवस्था अत्यंत स्वच्छ व वेळेत मुव्ह करणारी होती. स्वच्छतागृह पुढच्या मुक्कामी हलवताना त्यातील मल निसारण करणे ही  जिकरीची प्रोसिजर असते. हेही काम अत्यंत जबाबदारीपणाने करून घेतले. त्यामुळे पालखी मार्गावर कोठेही दुर्गंधी दिसून आली नाही. मुक्कामावरून ही यंत्रणा हलविताना अडचण निर्माण झाली तर बी प्लॅन आणि त्याही पुढे जाऊन सी प्लान तयार होता. या टीमवर्कमुळेच निर्मल वारीचा सोहळा यशस्वी झाला, असे त्यांनी नमूद केले. पालखी सोहळा प्रमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या “सोलापुरी पॅटर्नचे’ कौतुक केले आहे, हे येथे उल्लेखनीय. वारी सोहळ्यातील स्वच्छताग्रहाच्या व्यवस्थापनाचा अनुभव सांगताना प्रकल्प संचालक जाधव यांना शब्द कमी पडत होते. शेवटी राजकुमार सारोळे यांनी आभार मानले.

वार्तांकनाची मोठी जबाबदारी पार पाडली

  1. आषाढी वारी सोहळ्यातील जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या व्यवस्थापनाची बातमी मीडियापर्यंत पोहोचविण्याचे काम पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे उत्कृष्टपणे केले. त्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. वार्तांकनाच्या अनुभवाबद्दल सांगताना सचिन जाधव म्हणाले की मी अनेक वाऱ्याचा अनुभव घेतला आहे. जिल्हा परिषदेचे काम मोठे आहे. अधिकारी व कर्मचारी ही जबाबदारी समन्वयाने पार पाडतात. शासनस्तर, जिल्हा प्रशासनाकडून याचे नियोजन कसे होते? याची माहिती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मीडियापर्यंत पोहोचवण्याच्या जबाबदारीबरोबरच निर्मल वारीचे काम करण्याचा आनंद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button