सोलापूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची पुन्हा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी जिल्हा परिषदेत तीन वर्ष कामकाज केले. त्यांची पहिली पोस्टिंग धाराशिव पंतप्रधान सडक योजनेचे कार्यकारी अभियंता म्हणून झाली होती. त्यानंतर ते राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे बदलून गेले. या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत वरळी ते बांद्रा सिलिंकचे मोठे काम झाले. मुंबई पुणे द्रुतगती फोरलेनच्या मार्गाचे काम त्यांच्या काळात झाले. मंत्रालयात हायवे डेस्कला असताना दहा लेनच्या कामाला सुरुवात झाली. घाटातील सर्वेक्षण त्यांच्या काळात झाले. समृद्धी महामार्गाचे नियोजनाचे काम त्यांनी काही काळ पाहिले. सोलापूर राष्ट्रीय महामार्गाकडे असताना त्यांनी रेल्वे स्टेशन जवळील साडेतीन कोटीचा पूल बांधला. त्यांच्या काळात जमखंडी पुलाचे काम मंजूर झाले. मोहोळ, कुरूल, कामती, मंद्रूप तसेच 13 मैल, तांदूळवाडी बायपासचे काम झाले. टेंभुर्णी ते लातूर मार्गाचे डांबरीकरण कामाची वर्कऑर्डर झाली. त्यानंतर त्यांची जिल्हा परिषदेकडे बदली झाली. जिल्हा परिषदेच्या कार्यकाळानंतर त्यांची पुन्हा राष्ट्रीय महामार्गाकडे बदली झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे मोठी कामे केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या छोट्या कामांमध्येही त्यांनी त्याच आवडीने काम केले. अभियंता हा अभियंताच असतो, त्याच्याकडे कोणते का काम असेना ते गुणवत्तेचे झाले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी ज्युनिअर अभियंत्यांना दिली. जिल्हा परिषदेत काम करताना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा वेगळा पाया रचला. या कार्यक्रमात त्यांनी हिरारीने भाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी अमिताभचे डॉन सिनेमामधील गाणे उत्कृष्टपणे सादर केल्यामुळे त्यांना झेडपीचे डॉन म्हणून ओळखले जाऊ लागले. हरहुन्नरीपणामुळे ही एक त्यांची नवी ओळख महाराष्ट्रातील अभियंत्यांना झाली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मनीषा आव्हाळे व सीईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची त्यांना जिल्हा परिषदेत संधी मिळाली. पंढरपूरच्या आषाढी वारीचे त्यांनी चांगले नियोजन केले. कदाचित पांडुरंगाची सेवा करावी करावयाची असल्याने माझी झेडपीकडे तीन वर्षासाठी नियुक्ती झाली असावी अशी प्रतिक्रिया दोनच दिवसांपर्वी त्यांनी दिली होती, हे येथे उल्लेखनीय.

More Stories
अवैध धंदे, नुकसान भरपाई, डीपीच्या मुद्द्यावर गाजली डीपीसीची बैठक
फोंडशिरसच्या मतदान केंद्राध्यक्ष व पोलिसाला निलंबित करण्याचे आदेश
बारावीचा इंग्रजीचा पहिला पेपर; परीक्षार्थीपेक्षा पालकांचीच घालमेल