March 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

गौरीसमोरील पळविला जातो “बाळकृष्ण’ तुम्हाला माहित आहे का ही परंपरा

सोलापूर: आज रविवार दि.31 ऑगस्ट रोजी ज्येष्ठा गौरीचे आवाहन होणार असून, उद्या १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे आणि त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. विविध भागात वेगवेगळ्या परंपरेने महालक्ष्मी पूजन केले जाते. गौरी पूजनाची प्रथा, पूजा पद्धती वेगवेगळ्या असून यामध्ये बाळकृष्ण चोरीची एक पारंपारिक मनोरंजक कथा सांगितली जाते. चला तर जाणून घेऊया गौरीमध्ये बाळकष्णाची चोरी कोण करतात.

भाद्रपद शुद्ध षष्ठीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन, दुसऱ्या दिवशी सप्तमीला ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व अष्टमीला मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा करण्याची पद्धत असल्यामुळे ज्येष्ठागौरी असे म्हणतात. त्यामुळे सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी, गौरी म्हणजेच महालक्ष्मीचे पूजन केले जाईल. आपल्या सौभाग्याचे रक्षण व्हावे म्हणून सर्व देव स्त्रियांनी श्री महालक्ष्मीची आराधना केली. दैवी शक्ती प्रगट झाली व तिने राक्षसी वृत्तींचा नाश केला, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरीपूजनाचा सण साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली असे सांगितले जाते.

आता आपण गौरी पूजनाच्या विविध पद्धती आणि मान्यता जाणून घेऊया. एकदा भगवान शिवशंकर पार्वतीला काळा रंग असल्यामुळे काली म्हणाले. पार्वतीला राग आला. पार्वती मातेने तप केले व तिचा रंग गोरा झाला. म्हणून या सणाला गौरी पूजनाचा सण म्हणू लागले. गणपती उत्सवात हा सण येत असल्यामुळे या सणाला गौरी गणपती असेही म्हणतात. या काळात महालक्ष्मी ज्येष्ठा, पार्वती कनिष्ठा यांची एकत्र पूजा करण्याची पध्दत आहे. काही ठिकाणी गौरी या गणेशाच्या बहिणी असल्याचा उल्लेख आहे. गणपतीबरोबर ज्येष्ठा व कनिष्ठा या त्याच्या बहिणींची पूजा करण्याची पध्दत आहे. आपापल्या घराण्यांच्या पध्दतीप्रमाणे गौरी बसविल्या जातात. यात विविधता आहे. काही जण कुंभारवाड्यातून मुखवट्याला शोभतील असे दोन सुगडं आणून ते रंगवितात. त्यावर नाक, डोळे काढतात. काहींच्याकडे पितळेचे मुखवटे गौरी म्हणून बसवितात. काही ठिकाणी जिवतीप्रमाणे चित्राची पूजा करतात. काही ठिकाणी कुमारिकेकडून सुवासिक फुलांच्या वनस्पती आणतात व गौरी म्हणून पूजा करतात. कोकणात शेतकरी तेरड्याचे रोप आणतात ते सुपात लावून त्यावर मुखवटे ठेऊन त्याला साडी नेसवतात. काही लोक मडक्यांची उतरंड रचून किंवा डब्यावर डबे ठेवून त्यावर मुखवटे ठेवून गौरी उभ्या करतात. कोकणस्थ मंडळी नदीवरून पाच किंवा सात खडे आणून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात अलीकडच्या काळात गौरी पूजनाचे महत्त्व वाढले असून वेगवेगळ्या पद्धतीने गौरी बसविल्या जातात. गौरीपुढे खेळणी, आकर्षक ऐतिहासिक पौराणिक व सद्यस्थितीवरील प्रकाश टाकणारे देखावे सादर करून व सजावट करून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गौरींचा आगमनानिमित्त घर सजविले जाते.

सर्वच घरांमध्ये गौरी नसतात. ज्यांच्याकडे पुरातन कालापासून व ज्यांना नव्याने गौरी पूजनाचे दोरे, मुखवटे सापडतात त्यांना गौरी सण साजरा करता येतो. गौरी सणा अगोदर आठ दिवसापासून तयारी सुरू होते. गौरीसमोर अनेक फराळाचे पदार्थ, गहू तांदुळाच्या राशी मांडतात. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. घरातील दोन सुवासिनी गौरींच्या मुलासहित दोन ताम्हणात मुखवटे घेऊन एकमेकीला हळदीकुंकू देऊन त्या मुखवट्यांची भेट घडवतात. मुखवटे हातात घेतलेली स्त्री, गौरी आल्या का? आल्या.. आल्या… गुराढोरांच्या पावलाने.. गौराई.. गौराई कुठं ग आलीस? असे म्हणते तेंव्हा दुसरी स्त्री ज्या स्थानावर गौराई आलेली असेल त्या स्थानाचा उच्चार करून, गौराई बैठकीच्या खोलीत, स्वयंपाक घरात, झोपण्याच्या खोलीत, ओसरीवर आली असे म्हणते. यावेळी लहान मुले घंटी, ताटव वाटी वाजवून तिचे स्वागत करतात. या तीन दिवसात गौरींच्यामध्ये गणपती ठेवला जातो. तसेच देव्हाऱ्यातील दैवतांचेही गौरी समोर पूजन केले जाते. यात बाळकृष्णही असतो. नैवेद्यात १६ प्रकारच्या भाज्या असतात. १६ पुरणाचे दिवे करुन पूजा करतात. महिलांना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करतात. देवीचा महानैवेद्य अष्टमीला सकाळी प्रसाद म्हणून खातात. या दिवशी खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौऱ्यांचे विसर्जन केले जाते. गौरी पूजनाने दुःख नष्ट होते व लक्ष्मी स्थिर राहते अशी लोकश्रध्दा आहे. या सणाचं महत्व म्हणजे, अलक्ष्मीला घरातून घालवण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना केली जाते.

अशी होते बाळकष्णाची चोरी…

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गौराई समोरील बाळकृष्ण पळविण्याची परंपरा आहे. नेहमीच बाळकृष्ण पळविला जातो असे नाही. ज्यांच्या घरी बराच काळ मुल होत नसेल तर ते आपल्या नात्यातील गौराई समोर ठेवलेला बाळकृष्ण गुपचूप पळवून आणतात. यामुळे घरात बालकाचे आगमन होते अशी एक आख्यायिका सांगितली जाते. पळून आणलेल्या बाळकृष्णाचे वर्षभर पूजा केली जाते. त्या घरात ज्यावेळी मूल जन्माला येते त्यावेळी ज्यांच्या घरून बाळकृष्ण आणला त्यांना ही गोष्ट सांगितली जाते. त्यानंतर पुढील गौराई आगमना अगोदर या घरच्यांना विधीवत बाळकृष्ण परत केला जातो. यावेळी त्या गौराईला नवीन साड्या व गौराईच्या मालकिणीला पूर्ण आहेर आणि बाळकृष्ण सोबत तुळस देण्याची परंपरा आहे. कृष्णाला काना असे संबोधले जाते. त्यामुळे बाळकृष्ण परत करताना सुवासिनींना बोलवून पुरणाच्या उकडलेल्या कानुल्याचे वाटप केले जाते. ग्रामीण भागात क्वचितच असा प्रसंग तुम्हाला पाहायला मिळेल.

महादेवाचे पिंडही नेतात…

बाळकृष्ण पळविण्याबरोबर महादेवाची पिंड ही नेण्याची काही ठिकाणी परंपरा सांगितली जाते. बाळकृष्ण व महादेवाच्या पिंडीला तुळशीच्या ठिकाणी पुजतात. ग्रामीण भागात बराच काळ पाऊस झाला नाही तर अनेक जण आपल्या नातेवाईकांच्या तुळशीमधील महादेवाची पिंड पळवितात. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने पाऊस येतो, अशी शेतकऱ्याची धारणा आहे. यामुळे ही पिंड आपल्या घरी नेऊन ते पूजन करतात. ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी ही पिंड विधीवत संबंधिताला परत केली जाते, असे सांगण्यात आले. या कथांबाबत लिखित उल्लेख मिळाला नाही पण ग्रामीण भागात या प्रथा सर्रासपणे पाळल्या जात असल्याचे अनेक माहितीगराकडून सांगण्यात आले.