सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञांचा झाला सन्मान

सोलापूर: विधी क्षेत्रात दीर्घकाळ सातत्यपूर्ण, प्रामाणिक, निर्भीड व समाजाभिमुख सेवा देणाऱ्या ज्येष्ठ अधिवक्त्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला विधिगंध पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरातील रंगभवन सभागृहात अत्यंत उत्साही व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्याचा मुख्य उद्देश विधीक्षेत्र बळकट करण्यासाठी, सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि विधी क्षेत्रात नैतिकतेचे उच्च मूल्य जपण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या अधिवक्त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा होता. यंदाचे विधिगंध पुरस्कार कै. ए. डी. ठोकडे स्मृती विधिगंध पुरस्कार हा बार्शी येथील ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. सुभाष शंकरराव जाधवर यांना तर ए. तु. माने स्मृती विधिगंध पुरस्कार हा पंढरपूर येथील ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. भारत अनंतराव बहिरट यांना तसेच कै. तात्यासाहेब नेलेकर स्मृती विधिगंध पुरस्कार हा सांगोला येथील ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. जालिंदर अप्पासाहेब ढेरे यांना प्रदान करण्यात आला. या तिन्ही पुरस्कारार्थींनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत कायद्याची सेवा करताना न्याय, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी अनेक गरजू, वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अनिस सहस्त्रबुद्धे (सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट अंपायर) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फौजदारी क्षेत्रातील जेष्ठ वकील अॅड. धनंजय माने व सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जेष्ठ वकील अॅड. व्ही. एस. आळंगे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे, खजिनदार अॅड. अरविंद देडे, सहसचिवा अॅड. मीरा प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ऍड. संतोष नवकर यांनी प्रास्ताविकात विधिगंध पुरस्कारांची संकल्पना, त्यामागील उद्देश, तसेच विधी क्षेत्रातील अशा प्रेरणादायी उपक्रमांचे महत्त्व विशद केले. समाजात सकारात्मक मूल्यांची जपणूक करण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा विशेष सन्मानार्थ सर विश्वेश्वरय्या पगडी व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार भारतीय संस्कृतीतील पर्यावरणपूरक व सन्मानाचा प्रतीक म्हणून विशेष ठरला.यानंतर पुरस्कारप्राप्त मान्यवरांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनातील संघर्ष, अनुभव, समाधान व समाजासाठी केलेल्या कार्याविषयी सांगितले. त्यांनी युवा वकिलांना नैतिकता, संयम, अभ्यास व प्रामाणिकपणा या मूल्यांचे पालन करण्याचा संदेश दिला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधिगंध साप्ताहिकाच्या नवीन अंकाचे प्रकाशन करण्यात आले. विधिगंध सेवा संस्था व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेची माहिती देऊन मान्यवरांच्याहस्ते टीशर्टचे अनावरण करण्यात आले, व स्पर्धेचे उदघाटन देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिस सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, विशेषतः IPL स्पर्धांमध्ये अंपायरिंग करताना आलेल्या अनुभवांचा उल्लेख केला. निर्णयक्षमता, संयम, निष्पक्षता व आत्मविश्वास हे गुण केवळ खेळातच नव्हे तर न्यायप्रणालीतही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.



