March 7, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शहीद जवानांच्या कुटुंबीयातर्फे “या’ आमदाराचा झाला सत्कार

सोलापूर : शहीद जवान कुटुंबीयांच प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दल  जवान परिवाराच्यावतीने आमदार अभिजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

देशाचे रक्षण करताना आपले प्राणांचे बलिदान देणाऱ्या राज्यातील ३०० च्या आसपास शहीद जवानांच्या कुटुंबातील शहीद जवानांच्या पत्नी, पाल्य व पाल्यांच्या पत्नी शासकीय नोकरीत असून त्यांना कुटुंबियांसमवेत राहून कुटुंबियांची काळजी घेता यावी यासाठी शहीद जवानांच्या पाल्यांना व पाल्यांच्या पत्नीला ते ज्या शासकीय विभागात नोकरीला आहेत त्या विभागांतर्गत होणाऱ्या बदली प्रक्रियेत प्राधान्यक्रमाने सुट मिळावी ही शहीद जवानांच्या कुटुंबियांची मागणी व इतर मागण्या माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडून त्याकडे शासनाचे लक्ष वेधले. आमदार अभिजित पाटील यांचा राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या वतीने शहीद जवान परिवाराचे सदस्य विनोद वारे व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष आक्रोश शिंदे, तात्यासाहेब जाधव, नागेश व्यवहारे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वागज, बालाजी शिंदे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख उपस्थित होते.

शहीद जवानांच्या बलिदानाला मानवंदना 

राज्यातील शासकीय नोकरी करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या समस्या आमदार अभिजित पाटील यांनी शासनासमोर मांडल्या, त्या समस्यांची सोडवणूक आमदार अभिजित पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच होईल.बदली प्रक्रियेत प्राधान्यक्रमाने सुट मिळाल्यास शहीद जवानांच्या पाल्यांना आपल्या कुटुंबाजवळ राहून आपल्या आईची, कुटुंबियांची काळजी घेता येईल व त्या कुटुंबाला आधार मिळेल हीच खरी शहीद जवानांच्या बलिदानाला मानवंदना ठरेल. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आमदार अभिजित पाटील यांच्यासोबत असतील अशी भावना यावेळी शहीद जवान परिवाराचे सदस्य विनोद वारे यांनी व्यक्त केली.

कुटुंबियांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करू

शहीद जवानांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी शहीद जवान परिवाराला दिली.