February 20, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात शिवजन्मोत्सवाचा थाट

सोलापूर : नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि मराठमोळ्या संस्कृतीचा साज चढवलेल्या जिजाऊंच्या लेकींनी ‘चंद्र जसा हा इंद्र शोभतो, पुत्र जिजाऊंचा, झुलवा पाळणा, पाळणा, बाळ शिवाजीचा’ हे पाळणा गीत गाताच संपूर्ण परिसर शिवमय झाला. टाळ्यांचा कडकडाट, जयघोष आणि भक्तिभावाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा बुधवारी मध्यरात्री अभूतपूर्व उत्साहात पार पडला. या शिवपाळण्यातून हिंदवी स्वराज्याचे भावविश्व उलगडल्याने हजारो शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने शहरातील शिवाजी महाराज या मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हा भव्य पाळणा सोहळा आयोजित करण्यात आला होता. रात्री अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारोंच्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या. नऊवारी साडी, पारंपरिक अलंकार आणि सांस्कृतिक वेशभूषेमुळे संपूर्ण परिसरात मराठमोळ्या परंपरेचे दर्शन घडले. अभूतपूर्व अशा दिमाखदार व उत्साही वातावरणात व टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

भव्य दिव्य अशा पाळणा सोहळ्याला देवकी रत्नाकर हडपद, रेखा शावरेप्पा नावी, रत्नाबाई बाबूराव चांदोडे, सुषमा दत्तात्रय माने या शहीद जवानांच्या वीर माता व पत्नींच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. सुरुवातीला जिजाऊ वंदना व नंतर शिवरायांची आरती म्हणण्यात आली. पाळणा सोहळ्याप्रसंगी महिलांनी फुगडीचा फेर धरून आनंद व्यक्त केला. मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्यावतीने यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती महामंडळाचे माजी ट्रस्टी अध्यक्ष कै. मुरलीधर घाडगे यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे, माजी ट्रस्टी सदस्य कै. अर्जुनराव सुरवसे यांच्या पत्नी यशोदाताई सुरवसे, कै.धर्मा भोसले यांच्या पत्नी सीताबाई भोसले, कै. विजय फुटाणे यांच्या पत्नी माजी नगरसेवका लता फुटाणे, ट्रस्टी सदस्य शिवाजीराव घाडगे यांच्या पत्नी सरोजनी घाडगे, दिलीप कोल्हे यांच्या पत्नी माजी उपमहापौर मंगला कोल्हे यांच्यासह लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवणार्‍या सोलापुरातील संजीवनी ज्योतीराम भोजने, सरोजिनी ज्योतीराम भोजने, अमृता ब्रह्मदेव ननवरे यांनीही पाळणा सोहळ्यात सहभाग घेतला.

हा पाळणा सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तरा बरडे-बचुटे, कृष्णा सुरवसे, अनिरूध्द पाटील, नामदेव पवार, रमेश जाधव, किरण भंडारी, संतोष जाधव, ब्रम्हदेव पवार, संजीवनी मुळे, चारूशिला जगदाळे, पुरूषोत्तम बोबडे, अंबादास सपकाळ, संदिप कशिद, सुजित चौगुले, लक्ष्मण भोसले यांच्यासह श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, विनोद भोसले, दिलीप कोल्हे, प्रभाकर रोडगे, ज्ञानेश्वर सपाटे, विवेक फुटाणे, राजाभाऊ काकडे, रवी मोहिते, देविदास घुले, सचिन स्वामी यांनी परिश्रम घेतले. पाळणा सोहळ्याचे धावते समालोचन श्वेता हुल्ले यांनी केले.

शिवगाथेतून उलगडला इतिहास 

डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या या भव्य दिव्य पाळणा सोहळ्यापूर्वी प्रांजल शिंदे यांनी पोवाडा सादर केला तर सिंहगड कालेजच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने शिवराज्याभिषेकाचा सोहळा व शिवगाथा सादर करून शिवरायांचा इतिहास उलगडला. पाळणा सोहळ्यासाठी व्यासपीठ विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. हा सोहळा पाहण्यासाठी जागोजागी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.

आज शहरातून मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या (गुरूवारी) दुपारी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत विविध मंडळांच्यावतीने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. 35 ते 40 मंडळे यात सहभागी होणार आहेत. सहभागी मंडळे इतिहास कालीन देखावे सादर करणार आहेत. मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक शिंदे चौकातील डाळिंबी आड येथून निघणार आहे. नवी पेठ, मेकॅनिक चौक, शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, चौपाडमार्गे पुन्हा डाळिंबी आड येथे मिरवणुकीचे विसर्जन होईल.

25 हजार जणांना शिवभोजन

थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्यावतीने शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होणार्‍या 25 हजार शिवभक्तांना शिवभोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून त्याच्या बदल्यात भोजन देण्याचा निर्णय मंडळाचे प्रमुख अमोल शिंदे यांनी घेतला आहे. या शिवभोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेवक अमोल शिंदे यांनी केले आहे.